जाणून घ्या नागपंचमीची कथा,नागपूजेची कारणे कोणती ?नागपूजेचा इतिहास,नागकुल व सिंधुसंस्कृती

0
437

नागपंचमी

_______________________________________________
डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

नाग हा अतिशय विषारी साप आहे, तरीही त्याची सर्वत्र पूजा केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या ठायी आपला आदरभाव व्यक्त करण्याकरिता तिची पूजा आपण करतो. पण त्यासाठी ती व्यक्ती उत्तम मानवी गुणांनी युक्त म्हणजेच पूजनीय असावी लागते. नाग हा तर एक वन्य व विषारी पशू आहे. तरीही त्याची पूजा का केली जाते,हा प्रश्न कोणत्याही माणसाच्या मनात येणे स्वाभाविक आहे . पण तसे सहसा होत नाही . त्याला कारण आहे रुढी. ‘ शास्त्रात रुढीर्बलीयसी ‘ अर्थात शास्त्रापेक्षा रुढी बलवान असतात असे म्हणतात. पण रुढी किंवा परंपरा दृढ का होतात, याचा विचार केला तर तिच्या मागील शास्त्रीय कारणे समजायला मदत होते. परंतु सर्वसामान्य माणूस त्या भानगडीत पडत नाही. एक वहिवाट म्हणून तो रुढी- परंपरांना स्वीकारतो. त्याचबरोबर धर्माचे अंग म्हणून त्याचे उदात्तीकरणही करतो. त्यामुळे अनेक लोकधारणा प्रस्थापित होऊन अधिक बळकटी त्यांना येते. सर्वसामान्य माणसाचे भावजीवन या रुढी परंपरांनी समृद्ध झालेले असते. तसेच त्याच्या जगण्याचा एक आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच लोकपरंपराचा आदर करण्याची भूमिका सुजाण लोक घेतात. अभ्यासकांची दृष्टी ही तशीच असते, पण या लोकपरंपरांच्या मुळाशी एखादा विचार असावा या जाणिवेने त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न ते करीत असतात. असा प्रयत्न जगभरातील विद्वान संशोधकानी केलेला आहे. त्याचा मागोवा घेत आपण नागपूजेमागील दृष्टिकोनाचा वेध घेऊया.

पशूपूजेमागील भूमिका

भारतात पशु-पक्ष्यांच्या रुपात अनेक देवतांची पूजा केली जाते. मानवी जीवनाला केंद्र न मानता प्रतिकांना अथवा प्रतिमांना पूजणाऱ्या लोकांकडे नेहमी हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले जाते. पण तसे केवळ भारतातील लोकच करीत नसून जगभरातील आदिम अवस्थेतील अथवा तशा मानसिकतेतील लोक करीत असतात हे एक वास्तव आहे. त्याविषयी डॉ. आ.ह. साळुंखे मराठी विश्वकोश: ९ पृ. ३३०) म्हणतात,

“जगातील बहुतेक सर्व लोकांत प्रागैतिहासिक काळापासूनच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पशुपूजा चालत होती असे दिसते. विशेषत: व्याध संस्कृती, पशुपालन संस्कृती व कृषी संस्कृती यांमध्ये ती अधिक प्रमाणात होती. पशु पूजेच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ती बहुधा प्रतिकात्मक असते ही होय. कारण विशिष्ट पशूची पूजा करताना, बहुधा त्या पशूची एक पशू म्हणून पूजा केली जात नाही, तर त्या पशूमध्ये असलेल्या निसर्गातील शक्तींची वा देवतांची पूजा केली जाते. काही समाजात हा पशू पुराणकथेतला असतो. प्रत्यक्ष एखाद्या पशूलाच देवता मानल्याची उदाहरणे आढळतात. उदा. विशिष्ट वानर म्हणजे हनुमान वा विशिष्ट गरुड हे विष्णूचे वाहन वा नंदी हे महादेवाचे वाहन हे देव होत, असे हिंदूनी मानलेले आहे.”

पशूपूजेमागील कारणे

माणूस पशूची पूजा कोणत्या भावनेतून करतो, तेही महत्वाचे आहे. डॉ. आ. ह. साळुंखे त्याविषयी म्हणतात, “ पशूची आणि तीही विशिष्ट पशूचीच पूजा करण्यास मानव का प्रवृत्त होतो, याची विविध कारणे असतात. पशू पूजकाला पूज्य पशू हा पशू वाटतच नाही, त्या पशूत त्याला काही वेगळी शक्ती दिसते. वासावरून माग काढणे, आकाशात उडणे, पाण्यात पोहणे, कात टाकून पुन्हा तरुण होणे, दृष्टी तीक्ष्ण असणे, बिळातून अचानक प्रकट होणे, सुफलतेची क्षमता प्रचंड प्रमाणात असणे, इ. गोष्टीमुळे कुत्रा, पक्षी, मासा, नाग, बैल, यासांरख्या पशूजवळ काही विलक्षण, गूढ अनिवर्चनीय सामर्थ्य आहे, असे आदिम मानवाला वाटत असे. तसेच मानवाप्रमाणेच पशूंमध्येही आत्मा असतो, एवढेच नव्हे तर पशू, देव व मानव यांत काही समानता आहे, देवता व मृतात्मे पशुरुपात राहतात आणि प्रसन्न झाल्यास कृपा व रुष्ट झाल्यास हानी करू शकतात इ. समजुतीमुळेही ही मनुष्य पशुपूजेस प्रवृत्त होत असे.”

विदेशातील पशुपूजा

पशुपूजेमागील कारणे समजून घेतल्यानंतर आपल्याप्रमाणेच इतर देशातील लोकांमध्येही पशुपूजा प्रचलित असू शकते यावर आपला विश्वास बसू शकतो. म्हणून तिचे स्वरूप कसे आहे, तेही समजून घेणे आवश्यक आहे. ग्वातेमाला या बेटामधील लोक आपला सर्वश्रेष्ठ देव हरिणाच्या, तर यू जमातीचा एक देव तरसाच्या रुपात प्रकट झाला आहे असे मानतात. जगाच्या विविध भागात फुलपाखरे, सरडे, मासे, घोडे, डुक्कर इ. प्राण्यांच्या स्वरूपात देव प्रकट झाला असे म्हणतात. सामोआ मध्ये एकच देव दोन तीन पशूंमध्ये प्रकट झाला अशी समजूत आहे. पश्चिम आफ्रिकेत पाकोळीच्या, तर सयामात पांढऱ्या हत्तीच्या शरीरात पूर्वजांचे आत्मे प्रविष्ठ झाले असतात असे मानून त्यांची पूजा करतात. मगर, हरीण, मासे, कोल्हे, माशा, उंदीर, नाग इ. जीवांमध्ये पूर्वजांच्या मृताम्यांनी प्रवेश केला असतो, अशी कल्पना जगातील जमातींमध्ये आढळते.

कुलचिन्ह वा देवक

आपल्या कुळातील मूळ पुरुषांचा जन्म एखाद्या विशिष्ट पशूपासून झाला अशी धारणा होऊन त्या पशूला कुलचिन्ह वा देवक मानून त्याची पूजा करण्याची प्रथा अनेक जाती-जमातींमध्ये आहे. गवा, पतंग, गरुड, कावळा, मुंगी, मासा, बेडूक, ससा, अस्वल इत्यादिंना देवक व पूर्वज मानून त्यांची पूजा अनेक देशांमध्ये केली जाते. त्यांची पूजा करण्यामागे अशी भावना असते की, विशिष्ट पशू अथवा त्याचे गुण धारण केलेल्या देवतेने विश्वाची निर्मिती केली; किंवा संस्कृतीची उभारणी केली. जगातील अनेक देशांमध्ये या प्रकारच्या समजुती रूढ आहेत. जसे– एस्किमो लोकांमध्ये कावळयाने विश्वाची निर्मिती केली असून अग्नी आणला अशी समजूत आहे. पृथ्वीचा भार वाहणारे पशू हत्ती, बेडूक, नाग, बैल, इ. आहेत अशाही पुराकथा (Myths) आहेत. वयात येताना पशू स्वप्नात येतो व पुढे त्यामधील शक्तीच आपले रक्षण करतात अशी कल्पना काही लोकांमध्ये आहे. देवककल्पना त्यातूनच निर्माण झाली.

कुलचिन्हवाद (Totemism)

देवक म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते खरे तर कुलचिन्ह (Totem) असते. ‘कुल’ हा शब्द शेतीवर राबणाऱ्या कुटुंबासाठी वापरण्यात येत असे. कुटुंबासाठी कुल हा शब्द वापरण्यात येतो. पण “कुल म्हणजे कुंटुब नव्हे किंवा जातही नव्हे” असे पं. महादेवशास्त्री जोशी (भारतीय संस्कृतीकोश खंड दुसरा पृ. ४३४) म्हणतात. कुल म्हणज गोळा करणे, एकत्र येणे या धातुवरून कुल हा शब्द बनला आहे. नाते सबंधाने एकत्र आलेले लोक, असा त्याचा अर्थ आहे. एका नांगराला सहा बैल जोडल्यावर अशा दोन नांगराच्या साहाय्याने एका दिवसात जितकी भूमी नांगरली जाईल, तितक्या भूमीला कुल असे म्हणत असत. तंत्रशास्त्रात कुल म्हणजे शक्ती असा अर्थ होतो, असे पुढील श्लोकात म्हटले आहे.

कुलं शक्तिरिती प्रोक्तमकुलं शीव उच्यते ।

अर्थ- कुल म्हणजे शक्ती असे म्हटले असून, अकुल म्हणजे शिव असे म्हटले आहे. या ठिकाणी कुल हा स्त्रीवाचक शब्द आला आहे. त्यातून शेतीचा स्त्रियांशी असलेला प्रारंभीपासूनचा संबंध सूचित झाला आहे. कुलप्रमुख स्त्रिया असत हे यापूर्वी आपण पाहिले आहे. एका कुलापासून विभक्त झालेल्या कुलाची स्वतंत्र ओळख राहण्याकरिता कुलांना चिन्ह देण्याची प्रथा सुरू झाली. ती कशी झाली याविषयी जे संशोधन झाले त्याला कुलचिन्हवाद (Totemism) असे म्हणतात.
कुलचिन्हांच्या निर्मितीविषयी जगप्रसिद्ध मनोविश्लेषणशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड याने आपल्या ‘कुलचिन्ह व निर्बंध’ (Totem and Taboo) या ग्रंथात आपला सिद्धांत मांडला आहे. डार्विनच्या The Descent of Man II (पृ. 20, पृ. 603-604) मधील संशोधनाच्या आधारे त्याने त्याचे विश्लेषण केले. त्यानुसार आदिम अवस्थेतील मानवांच्या टोळीतील तरूण नर मोठे होतात तेव्हा टोळीप्रमुख प्रौढ नराशी त्यांचा संघर्ष होतो. त्यापैकी सर्वात शक्तिमान नर इतरांना मारून तरी टाकतो किंवा हाकलून देतो, आणि त्या टोळीचा मुख्य बनतो (डॉ. सॅव्हेज बोस्टन जर्नल ऑफ नॅशनल हीस्टरी, भाग 5, 1845-47). टोळीप्रमुखाची हत्या केल्यानंतर त्यामुळे शोकाकुल झालेल्या बायकांचे सांत्वन करण्याकरिता नव्या टोळीप्रमुखाने मृत टोळीप्रमुखाची स्मृती चिरंतन ठेवण्याच्या गरजेतून कुलचिन्हाची निर्मिती झाली. एखाद्या हिंस्र पशुच्या रूपात त्याने टोळीप्रमुखाला पाहिले. त्यामुळे तो हिंस्र पशू टोळीचे चिन्ह म्हणून पूजिला गेला. अशी कुलचिन्ह निर्मितीची कारणमीमांसा फ्राईडने केलेली आहे. विख्यात मानववंश शास्त्रज्ञ ब्रॉनीस्लाव्ह मालिनौस्की याने आपल्या ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता व ती दडपून टाकण्याची प्रक्रिया’ या ग्रंथात याविषयी वेगळी मते नोंदविली आहेत. बापाविषयीच्या भीती व द्वेषाविषयीच्या इंडीपस गंडाचा परिणाम कुलचिन्ह निर्मितीत झाला, ही फ्रॉईडची व्युत्पत्ती अनेकांना अपुरी वाटते. पण तरीही ती अधिक लोकप्रिय झाली आहे. कुलचिन्हाच्या निर्मितीत तिचे योगदान मानले जाते.

नागपूजा ही एक प्रकारची कुलचिन्ह पूजाच आहे. ती का सुरू झाली या विषयीची माहिती नागपंचमीच्या प्रचलित कथेतून आपणास मिळते.

नागपंचमीची कथा

पं. महादेवशास्त्री जोशी यांनी नागपंचमीला नागपूजेची कथा (भारतीय संस्कृतीकोश: खंड चौथा, पृ. ७३६) अशी दिली आहे-

“एक शेतकरी होता. एका सकाळी त्याने नित्याप्रमाणे जमीन नांगरण्यास प्रारंभ केला; परंतु नांगर जमिनीत घुसताच त्याखाली असलेल्या नागाच्या वारुळातील पिलांना त्याचा फाळ लागला व त्यामुळे ती मेली. हे पाहून नागिणीला राग आला व तिने त्या शेतकऱ्याला व त्याच्या बायकामुलांना दंश करून ठार मारले. मग तिला कळले, की त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. नागीण तिला मारण्यासाठी तिथेही गेली. पाहते तो त्या मुलीने पाटावर चंदनाने नाग काढून त्याची पूजा केली आहे व दूध – लाह्यांचा नैवेद्य दाखवून त्याची प्रार्थना चालवली आहे. ते दृश्य पाहून नागीण प्रसन्न झाली. नैवेद्याचं दूध पिऊन ती तृप्त झाली आणि तिने त्या मुलीला डोळे उघडण्यास सांगितले. मुलीने डोळे उघडले. समोर प्रत्यक्ष सळसळती नागीण पाहून ती घाबरली. नागिणीने तिला अभय दिले, झाला वृत्तांत कथन केला व मुलीच्या भक्तिभावाचे फळ म्हणून तिच्या माता-पित्यांना व भावंडाना पुनश्च जीवदान दिले.”

या कथेत नागिणीची पिले मारली गेली. या घटनेतून एखादा पशू मारला गेल्याने पश्चाताप व्यक्त करण्याकरिता, त्याच्या भितीतून कुलचिन्हाची निर्मिती झाल्याचा संकेत मिळतो. पण सूड म्हणून नागिणीने त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश करण्याची जी कल्पना आहे, ती मात्र सर्पाविषयी भ्रामक समजुतींना जन्म देणारी आहे किंवा प्रचलित समजुतीमधून ती तयार झाली आहे. कारण की, शेतकऱ्याच्या परगावी असलेल्या मुलीला मारण्याकरिता जेव्हा नागीण जाते, तेव्हा तिला ती मुलगी नागाची पूजा करताना दिसते. यावरून शेतकऱ्याच्या नांगराने नागिणीची पिले मरण्याआधी नागपूजा अस्तित्वात होती हे स्पष्ट होते. नागपंचमीला तरी किमान नाग किंवा त्यांच्या वंशाची हत्या होऊ नये म्हणून त्या दिवशी शेतातील कामे करू नये अशी निषेधाज्ञा या कथेतून दिली गेली आहे. कुलचिन्हाला अर्थात कुलचिन्हवाचक पशूला विशिष्ट दिवशी मारू नये असा संकेत जगभर आहे. पण त्याविरुद्ध ही असा संकेत आहे की, तो भक्ष्य असल्यामुळे त्याची पूजा केली जाते. पशुपूजेमागील परस्परविरुद्ध अशा दोन प्रकारांचा उल्लेख जे.बी. फ्रेझर या मानववंशशास्त्रज्ञाने केलेला आहे. त्याच्या मते, “मारल्या जाणाऱ्या आत्म्याने व मागे राहिलेल्या त्याच्या साथीदारांनी सूडभावनेने आपल्याला छळू नये, म्हणून अशा प्रकारची पूजा केली जाते.”

नागपंचमीचा सण

श्रावण महिन्यातला हा पहिला सण महाराष्टात घरोघरी साजरा होतो. श्रावण शुद्ध पंचमीलाच नागपंचमी असे म्हणतात. स्त्रिया या दिवशी हळद किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृती काढून त्यांची पूजा करतात. बऱ्याच ठिकाणी दाराच्या भिंतीवर फणायुक्त नाग रंगवून त्याची पूजा करतात. नागाच्या प्रतिमेला दूध व लाहया यांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, दिंड-मोदकासारखे उकडलेले पदार्थ करून खावे अशी प्रथा आहे.

नागदर्शनाठी काही जण गावाबाहेरील वारुळाकडे किंवा नागमंदिरात या दिवशी जातात. नागपंचमीच्या दिवशी फुगडया खेळणे, झाडांना झोपाळे बांधून झोके घेणे, फेर धरून गाणी म्हणणे यातून हा एक आनंदाचा सण आहे सूचित होते. नागपंचमीला स्त्रिया जी गाणी म्हणतात, त्यातून बाळाई, भारजा, जैता, बहुलागाय इ. कथा सांगितलेल्या असतात. नागोबाचे एक गाणे असे आहे –

चल ग सये वारुळाला । नागोबाला पूजायाला ॥
हळद कुंकू वहायला । ताज्या लाहया वेचायाला ॥
जमूनिया साऱ्या जणी । जाऊ बाई न्हवणा ॥
जिथं पाय ठेवू बाई । तिथं उठल दवणा ॥

नागोबाचं महत्व सांगणाऱ्या काही ओव्याही या दिवशी स्त्रिया गातात.

नागपंचमीला । नागा चंदनाचे गंध ।
तुटती भवबंध । पुजणाऱ्यांचे ॥
नागपंचमीला । नागाला घाला दूध ।
होईल बुद्धी शुद्ध । नागकृपे ॥
नागपंचमीला । नको चिरू भाजीपाला ।
दया शिकवू हाताला । आज सये ॥

नागपंचमीला सण हा स्त्रियांनी एक व्रत म्हणून साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. यात श्रावण शुध्द चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीला सकाळी अभ्यंग स्नान करावे व चंदनाने पाच फण्याचा नाग चितारावा असे सूचविलेले आहे. नागांसोबत नागपत्न्याही असतात. शेणाने भिंती सारवून त्यावर नागांची चित्रे चितारतात. सौराष्ट्रात श्रावण वद्य पंचमीला हे व्रत करतात. इतर ठिकाणी भाद्रपद शुद्ध पंचमीला करतात.

महाराष्ट्राबाहेरील नागपंचमी

महाराष्ट्रात नागपूजा लोकप्रिय आहेच. जिवंत नाग घेऊन घरोघरी फिरणारे गारुडी व नागांची पूजा करणाऱ्या स्त्रिया या दिवशी गावोगावी दिसतात. सातारा जिल्हयातील बत्त्तीस शिराळा हे गाव तर नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे. बंगाल व छोटा नागपूर या प्रांतात सर्पराज्ञी मनसादेवीची पूजा या दिवशी करतात. राजस्थानातील पीपा, तेजा इ. नागराज पूजा प्रचलित आहे. बिहारमध्ये जातीहीन मानलेल्या स्त्रिया स्वत:ला नागपत्न्या मानून नागगीते गातात. कर्नाटक राज्यात या दिवशी गूळ-पापडीचा नैवद्य नागांकरिता करतात, त्यांना तंबीट असे म्हणतात.

गुजरातमध्ये नागमूर्तीच्या समोर तुपाचा दिवा लावतात व नागमूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात. उत्तरप्रदेशात या दिवशी दुधाची भांडी घेऊन पुरुषमंडळी गावाबाहेरच्या जंगलात जातात. तेथील नागांच्या वारुळात दुधाच्या भांडयातील पाणी रिचवून परत येतात. काशीमध्ये या दिवशी सकाळी शाळकरी मुलांच्या मिरवणुका निघतात. ‘नागलो, भाई नागलो । छोटे गुरु का नागलो, बडे गुरु का नागलो, भाई नागलो ।’ असे म्हणत जातात. काशीतील नागकुँवा नावाच्या विहिरीवर संध्याकाळी नागमूर्तीचे पूजन होते. पंडितांमध्ये वादविवाद होतात व शेवटी जमलेले लोक या नागकुव्याचे पाणी पिऊन परत जातात. त्याला ते नागतीर्थ म्हणतात. पतंजली हा संस्क़ृत व्याकरणाकार शेषाचा अवतार होता, अशी समजूत येथील लोकांची आहे. मृत्यूनंतर याच कुव्यात त्याचे वास्तव्य आहे असेही ते सांगतात. नागपूजनाच्या अशा अनेक परंपरा देशभर प्रचलित आहे. त्यामागे कोणती कारणे असावीत, यावर अनेकांनी संशोधने केलेली आहेत व आपल्या परीने मतेही मांडली आहेत.

नागपूजेची कारणे कोणती ?

आचार्य काका कालेलकरांनी आपल्या ‘जिवंत व्रतोत्सव’ या पुस्तकात (पृ. ८६) “आजची नागपूजा ही नागाच्या भीतीमुळे उत्पन्न झाली असे म्हटले तर ते नाकबूल करता येणार नाही” असे म्हटलेले आहे. ज.नी. कर्वे यांनी ‘नाग’ या मराठी विश्वकोशातील (खंड ८, वृ. ४१०) टिपणामध्येही असेच मत मांडले आहे. ते म्हणतात, “’जगातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजामध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्वकाळापासून भारतात नागपूजा प्रचारात असावी. मोहेंजोदडो येथील उत्खनातही नागमूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भिती वाटते. ऋग्वेदात नागाचा उल्लेख ‘अहि’ या शब्दाने केला असून तेथे त्याचे क्रूरर, घातकी व भयंकर असे वर्णन केले आहे. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले, तर त्यापासून भय राहणार नाही; या कल्पनेने यजुर्वेदात नागस्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयापासून सुरू झाली असावी.”

सौ. इंदुमती पाठक (सण उत्सव, सं. सरोजिनी बाबर, पृ. ९२) यांनी नागपूजा नागांच्या भितीपासून सुरू झाली आहे,या मताला विरोध केला आहे. त्या म्हणतात, ” सर्प किंवा नाग हिंस्र म्हणून जर त्यांची पूजा होत असली तर वाघ किंवा सिंह यांची पूजा का होत नाही ?” पुढे त्या म्हणतात, ” नागपंचमी ही जुन्या नागवंशाच्या प्रतिकाची पूजा असावी अशी कल्पना आहे.” सौ. फाटक यांनी भितीपोटी नागपूजा सुरू झाली या मताला छेद देताना वाघ, सिंहांची पूजा का होत नाही, असा प्रश्न केला आहे. पण या हिंस्र श्वापदांचीही दैवत म्हणून अनेक आदिम जमातीमध्ये पूजा करण्याची प्रथा आहे. यामागे त्या प्राण्यांविषयीची भिती हेच कारण असावे असे अनेक विद्वानांनी म्हटले आहे. नागवंशाचे प्रतीक म्हणून नागपूजेचे कारण सौ. फाटक यांच्याप्रमाणेच डॉ.प्र. न. जोशी यांनीही सांगितले आहे. ते म्हणतात –

” महाराष्ट्रातील वस्ती मुख्यत: आर्य, द्रविड व नाग यांच्या मिश्रणाची आहे. नाग अथवा सर्प ही एक मानव जमात होती. या दिवशी (नागपंचमी) घरोघरी मातीच्या नागांची पूजा केली जाते. गारुडयांनी आणलेल्या जिवंत नागांना हळदकुंकू, फुले व लाहया वाहून पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य वाढतात. ” सर्वांभूती भगवद्भाव “ म्हणून सर्प अथवा नाग हाही एक उपकारक प्राणी म्हणून भारतीय संस्क़ृतीने त्यांना या दिवशी पूजनीय स्थान दिले आहे. नागापासून संरक्षणाचीही कल्पना या मागे असावी. एखाद्या घराण्याचा वास्तुपुरूष म्हणून नाग असल्याची ख्यातीही अनेक ठिकाणी आहे. संपत्ती, पुत्रादिकांचा लाभ, संरक्षण इत्यादिंशी व शिव, विष्णू, गणपती अशा देवतांशीही नागाचा सबंध प्रसिद्ध आहे. भगवान श्रीक़ृष्णांनी कालिया नावाच्या नागसर्पाचा पराभव या दिवशी केला असल्यानेही हा दिवस आजही महत्वाचा मानला जातो.”

नागकुल व सिंधुसंस्कृती

नागपूजेमागील कारणांमध्ये अतिशय महत्वाचे कारण आहे, ते भारतातील मूलनिवासी नागकुलाच्या गौरवीकरणाचे. सिंधूसंस्क़ृती ही नागसंस्क़ृती होती असे संशोधकांनी सिद्ध केलेले आहे. इ.स. पूर्व ३१८० ते ३१५० हा तिचा पहिला काळ, तर दुसरा काळ इ.स. पू. ३१५० ते २३३० हा निश्चित करण्यात आला आहे. ‘नाग संस्क़ृती कोश’कार अवंतिकाप्रसाद मरमट यांनी आपल्या ‘ वेदकालीन नागजातियों, राजाओं तथा संस्क़ृतीकी खोज’ (पृ. १०) या शोधसंग्रहात म्हटले आहे की, ” पाकिस्तानच्या पुरातात्विक संशोधनानुसार सिंधुसंस्क़ृतीच्या पुर्वीपासूनच तेथे नाग संस्क़ृती अस्तित्वात होती. त्यांच्या अहवालानुसार तेथील नागपूजनाची परंपरा तीन लक्ष वषापूर्वीपासून होती. इस्माईलखाँ पासून तो उत्त्तर पश्चिम सीमांत प्रदेशाच्या जयुब (बलुचिस्तान) पर्यंतच्या विशाल भूभागात ती पसरली होती. पाकिस्तानी पुरातत्ववेत्त्यांनी तिला ‘शेषनाग संस्क़ृती’ असे नाव दिले आहे.” सिंधूसंस्क़ृतीच्या विध्वंसाचा ऋग्वेदातील ऋचांमध्ये शोध घेणारे ॲड. प्र. रा. देशमुख यांनी आपल्या ‘सिंधू संस्क़ृती, ऋग्वेद व हिंदू संस्क़ृती’ या ग्रंथामध्ये नागकुळाविषयी विस्त़ृत माहिती दिलेली आहे. आपल्या कुळाचे चिन्ह ‘नाग’, त्याच्याशी साधर्म्य साधण्याकरिता सिंधूसंस्क़ृतीतील लोक आपल्या जिभेला चिरा देत असत. त्याविषयी ॲड. देशमुख म्हणतात –

“व़ृत्राला ऋचामधून ‘अही’ म्हटलेले आहे. व़ृत्रवाचक अही हा शब्द आर्यांच्या नागवंशीय शत्रूंचा द्योतक आहे. ‘अही’ म्हणजे दंश करणारा या अर्थी त्यांना दास, दस्यू ही नावे पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. आर्यांचे दास आणि दस्यू म्हणून संबोधलेले शत्रू नागवंशीय होते हे दाखविणारे त्याचे निदर्शक आणि मृध्रवाच: आणि मृध्र असे शब्द आहेत. ‘मृध्रवाच:’ याचा अर्थ सायनाने “हिंसित वागीन्द्रियान ‘ म्हणजे कापलेल्या जिभा असलेले असा दिला आहे. तो न कळून आधुनिक विद्वानांनी त्याचा तुटक तुटक बोलणारे असा अर्थ केला आहे. कारण माणसाच्या जिभा कापल्या असणे कसे संभवते हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. आर्यांचे शत्रू नागवंशीय असल्यामुळे अहीशी साधर्म्य दाखविण्यासाठी ते आपल्याला द्विजिव्ह करीत असत. तापलेल्या सोन्याने जिभेच्या टोकावर थोडासा चिरा देण्याची त्यांच्यात प्रथा होती. तप्त सुवर्णाने जिभेला चिरा देणारे व स्वत:ला अहिवंशी म्हणून घेणारे लोक आजही भारतात आहेत.”

या विवेचनावरून नागकुलाचा परिचय व त्यांच्या कुलचिन्हाचे – नागाचे पूजन करण्याची परंपरा भारतात का चालू आहे याचे कारण स्पष्ट झाले आहे. परंतु एक विचित्र गोष्ट अशी की, या परंपरेचे वहन करणाऱ्या नागपंचमीच्या सणात तिचा मागमूसही आढळत नाही. स्त्रियांनी म्हणावयाच्या गीतांमध्ये किंवा कथांमध्ये प्राचीन नागकुलाचा पुसटसाही उल्लेख येत नाही. या कहाण्या व गीतांमध्ये नाग हा भाऊ म्हणून येतो. डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह’ या शोधग्रंथात “नागाचा आणि स्त्रियांचा संबंध कसा हे मात्र कोडे वाटते’’ (पृ. ६७) असे म्हटले आहे. लोकसाहित्याच्या मूर्धन्य अभ्यासकांनाही कोडे वाटावे असा हा संबंध नागकुलातील माहेरच्या माणसांची स्मृती जपणारा आहे हे मात्र निश्चित.

लोकगीतातील ‘भाऊ’ नाग

‘लोकसंचित’ या पुस्तकात लोकसाहित्याचा ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर (पृ. १३७) यांनी लोकगीतांमधील भाऊ व नाग या संबंधावर प्रकाश टाकणारी गीते दिलेली आहेत. त्यापैकी एक गीत असे-

पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सखयांनी झाडांना हिंदोले

नवथर तरुणीचे सासुरवाशीण म्हणून नखरेपण ल्यायलेले पहिले काही दिवस अस्वस्थतेचे असतात. नागपंचमी आली की, आपला भाऊ न्यायला येणार या आशेने आसुरलेल्या सासुरवाशिणीची व्याकुळता कशी व्यक्त झाली ते पहा –

“आता नागरपंचमीचं ।
नाग आल्याची खेळायला ।
मी ग भैयाला सांगयितु ।
बारा सणाला नेऊ नको ।
पंचमीला रं ठेवू नको ।”

वर्षभराच्या बारा सणांना भावानं नाही आलं, तरी चालेल, पण पंचमीला भावानं मला सासरी ठेवू नये ; माहेरी न्यावं. “ कारण आता नागपंचमीचं नाग गेल्याती कोकणात. असे सगळीकडे नाग पोहोचलेत आणि मी मात्र अजून सासरीच !” याची खंत आणि आर्तता तिच्या गाण्यात राहिलेली असते. तारा भवाळकर म्हणतात, “स्त्रियांच्या मनात नाग आणि भाऊ यांचं नातं घट्ट बसलेलं आहे. नागपंचमीच्या पारंपरिक कहाणीतलं हे नातं सर्वाना माहीतच आहे….. स्त्री जीवनात नाग पिता, पुत्र, बंधू अशा विविध नात्यांनी येणाऱ्या पुरुषत्वाचा प्रतिनिधी म्हणून अनंत काळापासून वस्ती करून आहे. स्त्रीमन हे त्याचं वसतीस्थान आहे, घर आहे, वारूळ आहे. भूमी ही स्त्रीतत्वाची प्रतिनिधी लोकमानसाने मानलेली आहेच. म्हणून भूमीला महामातेच्या, जगन्मातेच्या, स्त्रीत्वाच्या रुपात लोकमन पाहत आलेलं आहे. जगन्मातेचं विशाल रूप म्हणजे पार्वती आणि जगत्पित्याचं विशाल रुरूप म्हणजे शिव ! शिव नागबंधानं बांधलेला. असं शिव-शक्ति’ स्त्री पुरुषत्व परस्परबद्ध आहे.’’ भाऊ म्हणून नाग लोकगीतात येतो तसा जहरी नाग म्हणून पतीही येतो. मराठीतील पहिले ग्रामीण कवी पां. श्रा. गोरे यांनी वऱ्हाडी लोकगीते’ या पुस्तकात (पृ. ११५) एक गीत दिले आहे-

“रुसले भरतार नाही म्हणावा आपला
शेतीच्या लावणीनं लाल इंगुळ तापला !
रुसला भरतार कधी भोळा म्हणू नाही
नाग उयशाचा काळा जहरी मोठा बाई !’’

नवरा म्हणजे उशाला घेतलेला जहरी नाग, ही उपमा त्राग्यापोटी दिली गेली. नागाचा फुत्कार व पतीची फटकार यातील साम्य दाखविण्याकरिता स्त्रीगीतांमधून बरेचदा नागप्रतिमा येते.

नागपूजेचा इतिहास

नागप्रतिमा जगभरातील सर्व संस्कृतीमध्ये आढळतात . वृत्राला “अही” म्हणून जसे संबोधले आहे, तशाच “अही” नावाच्या देवतेचा उल्लेख इजिप्तच्या पुराकथांमध्ये (Myths) आढळतो. तेथील प्राचीन राजघराण्याच्या स्त्री-पुरुषांच्या मुकुटावर नागप्रतिमा असते. चीनमधील ड्रगनविषयक पुराकथा एका जलसर्पावर आधारित आहेत. बॉबीलोनिया, इजिप्त, फ्रान्स, रोम, जपान, तिबेट, मलाया, कोरिया, मध्य आशिया इ. भागात सर्पप्रतिके व त्यांची उपासना प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. यावरून सर्प किंवा नाग हे तेथील रहिवासींचे प्राचीनकाळी कुलचिन्ह असावे हे स्पष्ट होते. नागकुलचिन्हाच्या वैश्विकतेमुळे नागबंधाला आदिबंध असे म्हणतात. (एव्हरी मॅन्स डिक्शनरी ऑफ नॉन क्लासिकल मायथॉलॉजी, पृ.१४८)

भारतीय नागपूजेचा सर्वात प्राचीन उल्लेख वैदिक परंपरेतील तैत्तिरीय संहितेत अश्वेमेध वर्णनप्रसंगी लोहिताही व वायस या नागांचे पूजन करावे (५.५.१३.१) वाक्यात आढळतो. अथर्ववेदात दरोडे-खोरापासून रक्षण होण्यासाठी नागाच्या कातीचे यंत्र वापरावे असे (१२.१.४६) म्हटले आहे. यजुर्वेदात रुद्राला अहिंसंन्त: (सर्पाचे सान्निध्य असलेला) असे म्हटले आहे. शतपथ ब्राह्मणात नागमाता कद्रु हिला पृथ्वीचे प्रतीक मानून पूजनीय ठरविले आहे. (३.६.२.२) अथर्ववेवेदात सर्पनाशक मंत्र आहेत; तसे गरुड व सर्प यांच्या वैराच्या कथाही आहेत. ब्राह्मणग्रंथात व त्यापुढे महाभारतात सर्पपूजेचा संप्रदाय बराच महत्व पावला, असे दिसून येते.

पौराणिक धर्मपरंपरेत नागाला अधिक महत्वाचे स्थान प्राप्त झाले. शिव आणि विष्णू या दोन प्रमुख देवतांचा नागांशी असलेला निकटचा संबंध पुराणांनी विस्ताराने वर्णन केला. शिव आपल्या शरीरावर नागभूषणे मिरवतो व शेषशायी विष्णू त्यावर विश्रांती करतो. शिवकवचस्तोत्रात शिवाला नागकुलभूषण म्हटले आहे. वैष्णवपुराणांमध्ये विष्णूला अनंतशयन किंवा शेषशायी म्हणून संबोधले आहे. अनेक शिवालयांमध्ये शिवलिंगाभोवती वेटोळे घालून तसेच त्यावर फणा धरलेल्या नागाचे शिल्प आढळते. राजस्थानमधील राजपुतांचे आराध्यदैवत असलेल्या एकलिंगजीच्या प्रतिमेभोवती नागवेष्टण आहे. बलराम या कृष्णाच्या भावाला शेषाचा अवतार मानले जाते. त्यामुळे कृष्णाने नागांना जाळले ही कथा ही खरी वाटत नाही.

शिव व विष्णू यांच्याप्रमाणेच जयपूर येथील कालीदेवीच्या मस्तकावरही नागफणा आहे. दक्षिण भारतात भद्रकाली देवीच्या शरीरावर सर्प दाखविलेले असतात. गणेशाचे उदर नागबंधाने आवळलेले आपण बरेचदा मूर्तीमध्ये पाहतो. पंढरपूरच्या विठोबाच्या शिरावर मागे नागफणा आहे, तसाच तो कोल्हापूरच्या भवानी मातेच्याही शिरावर आहे. खेडोपाडी घरात साप येऊ नये म्हणून आढयाच्या लाकडी तुळयांवर “आस्तिक” असा शब्द लिहितात. तसे केल्याने साप घरात येत नाहीत अशी समजूत आहे. जनमेजयाने केलेले सर्पसत्र आस्तिकाने थांबविले होते, अशी कथा महाभारतात आहे. सर्वांना अभय देणारा आस्तिक याचे नाव अशारितीने मंत्रासारखे वापरले जाते.

बौद्ध व जैन परंपरेत नाग

बुद्धाचे पहिले अनुयायी नाग होते. विदर्भातील नागपूर हे नागसंस्कृतीचे केन्द्र होते असे ‘प्राचीन भारतातील नाग’ या शोधग्रंथात डॉ. एच. एल. कोसारे यांनी सिद्ध केले आहे. बुद्धालाही नागांबद्दल आदर होता. बुद्ध जन्मानंतर नंद–उपनंद या नागांनी त्याला स्नान घातले. तसेच त्याला संबोधी प्राप्त झाल्यावर मुचलिंद नागाने त्यावर आपले संरक्षक फणाछत्र धरले अशी कथा आहे. बोधगया, भरहुत, अजिंठा, वेरुळ, पितळ-खोरे, नाशिक, कार्ले, भाजे इ. बौद्ध स्थळांमध्ये बुद्धाच्या सोबत नाग–राजा व राणी तसेच अनुयायी यांची शिल्पे कोरलेली आहेत. नागफणा असलेली बुद्धमूर्ती (सोन्याची) बौद्धस्तूपांना अर्पण करण्याची चाल ब्रम्हदेशात आहे. बौद्ध श्रमण नागांची पूजा करीत असत,असे चिनी प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहे.

नागांचे महत्व जैन परंपरेत आहे. तीर्थंकर पार्श्वनाथ याचे अभिज्ञात चिन्ह नाग आहे.

नागपूजा की प्रबोधन

आजही आधुनिक काळात नागपूजा घरोघरी होते. पण त्यासोबतच सापाविषयीची वैज्ञानिक माहिती देता आली, तर तिला अर्थ प्राप्त होईल. नागकथांमधून अंधश्रद्धा निर्माण करण्याचे काम होत आहे. बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणात साप अंगात येणे, त्याला नागमंत्री वा बाऱ्या म्हणणाऱ्यांनी काढणे या गोष्टी अवैज्ञानिक व लोकविरोधी आहेत. साप डूख धरतो, मंत्रामुळे सापाचे विष उतरते, नाग गाईच्या आचळांना तोंड लावून दूध पितो, सर्पाच्या अंगावर केस किंवा मिशा असतात, चावण्याकरिता सर्प परत येतो, सर्प देवाचे रूप असते, मासिक पाळी असलेल्या स्त्रीने सापास पाहिल्यास साप आंधळा होतो, नागांना पाच फण्या असतात, नाग धनाची राखण करतो, नाग स्वप्नात आल्यास म़ृत्यू येतो यासारख्या भ्रामक समजुती (सर्प व भ्रामक कल्पना ले. भालचंद्र मयेकर पृ. ५६) दूर करण्याकरिता सुशिक्षित लोकांनी पुढे आले पाहिजे. नागपंचमीचा दिवस सर्पविषयक वैज्ञानिक माहिती देण्याकरिता कामी आला तर नागपुजेचे प्रयोजन सार्थकी लागले असे म्हणता येईल.
____________________________________________________

साभार;- ( ‘सण-उत्सव ‘ या आगामी ग्रंथामधून ) लेखक;- प्रा.अशोक राणा यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here