*बळीराजाचा सण – बैलपोळा*

0
147

*बळीराजाचा सण बैलपोळा !*

*************************
* कोरोना मुळे यंदा पोळा सण
* बैल पूजन करूनच साजरा
* होईल .या बळीराजाच्या
* जिवाभावाच्या पोळा
* सणाची माहिती आम्ही आज
* देत आहोत -संपादक

*************************

शिंगे रंगवली
बाशिंगे बांधली
चढविल्या झुली
ऐणेदार……..

कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. दसरा दिवळीसारखाच शेतकरी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढतात. यांत्रिकीकरणामुळं बैलांची शेतातील कामं कमी झाल्यानं दावणीला त्यांची संख्या घटलीय खरी, पण त्यांचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. ‘एक नमन गवरा, पारबती हर बोला’ असा गजर करीत आज म्हणजेच पोळ्याला त्यांचं धुमधडाक्यात कौडकौतुक होतं.

पोळा हा प्रामुख्यानं खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात झोकात साजरा होतो. साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणच्या तऱ्हाही न्याऱ्या असतात.

#खानदेशचा_पोळा
खानदेशात परंपरेनं हा सण साजरा होतो. पोळ्याच्या दोन दिवस आधी खांदेपूजा होते. यामध्ये बैलांचे खांदे तेल, तूप लावून मळण्यात येतात. शिंग व खुरं तासण्यात येतात. नाभिकांकडून बैलांच्या शेपटीचे गोंडे सजवण्यात येतात. शिगांना रंग लावण्यात येतो. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ (वेसन) बैलांच्या नाकात घालण्यात येते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घण्टी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर मखमली झुल, माथोटी, दोर असे नाना गोष्टी वापरून सजवलेल्या बैलांची संध्याकाळी मिरवणूक काढण्यात येते. गावातल्या पाटलाचा बैल वेशीपर्यंत वाजत-गाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात. त्यालाच ‘पोळा फुटणं’ असं म्हणतात. हा पोळा फुटल्यावर घरमालकांनी परंपरेप्रमाणं पुरणपोळीचं जेवण करून उपवास सोडण्याची प्रथा आहे.

अशी होते पूजा…
#बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरण्यात येतो. रूईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात. सजवलेल्या बैलांना घरांसमोर आणून शेतीच्या साधनांची, अवजारांची पूजा करण्यात येते. खाटेवर दुसरं ठेवून विविध कडधान्ये, डाळींच्या मूठ मूठ राशी ठेवण्यात येतात. या राशींना ‘शिधा’ असंही म्हटलं जातं. बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल, असा समज आहे. त्यानंतर कारभारणीनं बैलांचं औक्षण करुन पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो.

*#वराडसीमचा_प्रसिद्ध_पोळा!*

खानदेशात जळगाव तालुक्यातील ‘वराडसीम’ या गावाचा पोळा प्रसिद्ध आहे. त्या गावातल्या जुन्या भव्य ऐतिहासिक दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवला जातो. शेकडो वर्षांपासूनची परंपरा यासणाला आहे. ती दरवर्षी पाळली जाते. घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचं पूजन होतं. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक काढण्यात येते. त्यालाच ‘बाशिंग्या बैल’ असंही म्हणतात. संध्याकाळी ‘तोरण तोडण्या’ची स्पर्धाही होते.

#विदर्भातही_जल्लोष
विदर्भातही मोठ्या जल्लोषात पोळा साजरा करण्यात येतो. इथं तान्हा पोळा ही परंपरा आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा होतो. लहान मुलं लाकडांनी सजवलेले बैल तान्हा पोळ्यात ठेवतात. लाकडी बैलाची आईनं पूजा केल्यानंतर वडील बोजारा देतात. नंतर लाकडी बैलाला तान्हा पोळ्यात ठेवतात. तान्हा पोळा फुटला की, चिमुकले बोजारा मागत घरोघरी फिरतात. यातून एक, दोन किंवा पाच रुपये चिल्लर मिळते. यासाठी नागपूरसह विदर्भातील अन्य प्रमुख बाजापेठ लाकडी बैलांनी खच्चून भरल्या होत्या. आंबा किंवा पाराच्या लाकडापासून हे लाकडाचे बैल बनविण्यात येतात.

*पोळा*

बळीराजाचे आजीव संगती!
जयांचे संगे शेती सेवे रंगती!
ते बैल कष्ट करोनिया दंगती!
कुळवाडी वरी!!

बैल राबती ते कुळवाडीवरी!
तयांचे प्रती उतराई होई तरी!
सण पोळा येत श्रावणा वरी!
हर्ष आनंद ! !

हर्षित आनंदे होई बैलपूजन!
रंग रंगोटी तया साग्र भोजन!
शिवे वरी वाजत सृष्टी सृजन!
ढोल ताशा!!

सवाद्य ढोल ताशे डफ सनई !
मिरवणूकी आनंद अपार होई!
बैलासंगे सणा हे होणे उतराई!
पोशिंदा कोटीचा!!

पोशिंदा कोटीचा राजा बळी!
कोरोना अरिष्ट येई अवकाळी!
तरी बैलांसी ग्रास पुरण पोळी!
निवारी बा आपदा!!

*👏🏻श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील जामनेर.जि.जळगांव🌹⛳*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here