विनासोंडेचा गणपती

0
378

विनासोंडेचा गणपती
_______________________________________________

डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

विनायक म्हणजे गणपती. सोंड असलेलं तोंड ही गणपतीची ओळख. मग सोंडेविना विनायक कसा असू शकेल? परंतु अशा विनायकाची उपासना दक्षिण भारतात प्राचीन काळापासून चालू आहे. विशेष म्हणजे तोच सर्वांत प्राचीन आहे, अशी तेथील लोकांची श्रद्धा आहे. म्हणून त्याला त्याला ते आदिविनायक या नावाने संबोधतात. गणपतीला गजानन या नावानंही संबोधलं जातं. आनन या संस्कृत शब्दाचा अर्थ चेहरा असा होतो. अर्थात, ज्याचा चेहरा हत्तीच्या चेहर्‍यासारखा आहे, तो गजानन ! गजमुख हे गणपतीचं नाव त्यामुळेच पडलं.

परंतु गणपतीचे मुख हत्तीचं कसं? असा प्रश्न ज्यांना पडला, अशा पुराणिकांनी त्याचं उत्तर देण्याच्या मिशाने अनेक कल्पित कथांची निर्मिती करून त्यांची पेरणी गणपती भक्तांच्या मेंदूत करून ; गजानन किंवा गजमुख हेच गणपतीचं व्यवच्छेदक लक्षण म्हणून पुढे आणलं. भारत व भारताबाहेरही गणपतीच्या उपासकांनी गणपतीपूजन प्रचलित केलं. त्या त्या ठिकाणी गजमुखाचं रहस्य अधिकच गडद झालं. कारण की, हे रहस्य उलगडण्याच्या हेतूने ज्या कथांचा डोलारा निर्माण झाला, तो अनेक विसंगतींनी भरलेला होता.

गणपती भक्तांना मात्र या विविध व विचित्र अशा कथांविषयी कधीही शंका नव्हती, तशी आजही नाही. गणेशोत्सवाच्या दरम्यान अशा कथांची पेरणी, पूर्वीच्या पुराणिकांची भूमिका बजावणारी आजची प्रसारमाध्यमं हिरीरीने करतात. अर्थात, लोकांचं अज्ञान घालवण्याकरिता असलेलं त्यांचं औचित्य ते घालवून बसतात. त्यांनी खरं तर, याविषयी आजवर झालेल्या संशोधनांचीही माहिती लोकांना घ्यायला हवी. कारण की गणपतीच्या गजमुखाचं स्पष्टीकरण कल्पित कथांच्याव्दारे देण्यापेक्षा जगभर याविषयी झालेल्या मानववंशशास्त्रीय संशोधणाच्या आधारेच ते नीटपणे दिलं जाऊ शकतं. तसं झालं तर, गणपती किंवा विनायक या संकल्पनेविषयी असलेले अपसमज दूर होण्यास मदत होऊ शकते.

अर्थात, श्रद्धावान लोकांना या संशोधनाने थोडा धक्का बसू शकतो; परंतु प्रचलित विचित्र व काल्पनिक कथांनी गणपतीची विटंबना चालू आहे, असं जर त्यांना कळलं तर मात्र त्यांना त्याहीपेक्षा मोठा धक्का बसू शकतो. म्हणून गणपतीविषयीच्या आजवरच्या संशोधनांचा थोडक्यात आढावा घेऊन आपण आदिविनायक या विनासोंडेच्या विनायकाचा परिचय करवून घेऊया.

गणपतीविषयीची संशोधनं

आज आपण हिंदूधर्मातील आद्यदैवत म्हणून गणपतीकडे श्रद्धेने पाहतो ; परंतु हिंदू हा शब्द जेव्हा अस्तित्वात नव्हता, तेव्हाही गणपतीची उपासना चालू होती. या उपासनेचा इतिहास साधारणपणे पाच हजार वर्षांचा आहे. तो थेट सिंधू संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचतो.

सिंधु संस्कृतीमधील पशुपतीच्या मुद्रेतून, तो आजचा शिव म्हणजे महादेव होय, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. त्यालाच आर्यपूर्व भारतीय लोक गणपती या नावानेही संबोधत असत. कारण की तो गण अर्थात तत्कालीन लोकशाहीवादी समाजव्यवस्थेचा नायक म्हणजे नेता होता. म्हणून त्याला गणनायक या नावानेही संबोधलं जात असे.

ऋग्वेदात ज्या ब्रह्मणस्पतीला ‘उद्देशून गणानां त्वां गणपतिं हवामहे’ असं म्हटलं आहे. तो भारतातील आर्यपूर्व मूलनिवासींचा नायक आहे. त्याला सोंड असल्याचा कोठेही उल्लेख नाही; परंतु अज्ञानापोटी अनेक तथाकथित विद्वान गजमुख गणपतीचं मूळ ऋग्वेदातील या ऋचेमध्ये शोधतात. या ऋचेची निर्मिती ज्या गृत्समदाने केली, तो आर्यपूर्व व्रात्य या शूद्र जमातीतील विद्वान होता. त्याने आपल्या नेत्याला केलेलं ते वंदन आहे. त्याचा समावेश आर्यसमूहात झाल्यावर त्याच्या त्या काव्याचा समावेश ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडलात झाला. या मंडलानेच ऋग्वेदाचा प्रारंभ झाला आहे. कारण की पहिलं मंडल उत्तरकालीन असल्याचा निष्कर्ष विद्वानांनी काढलेला आहे.

ऋग्वेदाच्या निर्मितीनंतर दीड हजार वर्षातच गणपती अर्थात विनायकाची निंदा करणारं साहित्य मनुस्मृती, मानवगृहयसूत्र, बोधायनस्मृती इत्यादी वैदिक ग्रंथांच्या रूपाने निर्माण झाले. त्यानंतर पाचव्या शतकात गजमुख विनायकाची उपासना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, या परिसरात सुरू झाली. परिणामी, गजमुख गणपतीची आराधना करणार्‍या गणेशपुराण, मुदगलपुराण इत्यादी पुराणांची निर्मिती तेराव्या शतकात झाली. गजमुख गणपतीला प्रस्थापित करण्यात या पुराणांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांनाच आज प्रमाण मानलं जातं.

गेल्या शतकात एलिस गेट्टी, एच. हेरॉस, ए. फौचर इत्यादी विदेशी विद्वानांनी गजमुख विनायकावर सखोल संशोधन करून, प्राचीन काळी गणपतीला हत्तीच मुख नव्हतं, तर अनेक टोळ्यांची कुलचिन्हं असलेले मुखवटे विशिष्ट प्रसंगी टोळीचा नायक आपल्या चेहर्‍यावर लावत असत, हे स्पष्ट केलं आहे. भारतीय विद्वान देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी तर आपल्या ‘लोकायत’ या ग्रंथात गणपती या विषयावर विस्तृत असं ८३ पृष्ठांचं प्रकरण लिहिलेलं आहे. त्यात ‘हत्तीप्रमाणे सिंह, वाघ, लांडगे, कोल्हे, बैल, कुत्रा, हरीण इत्यादी मुखवटे धरण करणारे गणपती होते,’ अशी माहिती दिलेली आहे. त्यादृष्टीने हनुमान, नरसिंह इत्यादी देवता गणपती होत्या. फादर हेरॉस आपल्या ‘प्रॉंब्लेम ऑफ गणपती’ या शोधग्रंथात म्हणतात की, ‘In the period which we may call the pre-history of Ganapati, he had not head of an elephant. His face was the face of a beautiful youth. The appearance of the head of an elephant seems to have been due to the action of the Nagas. “ हेरॉस यांचं निरीक्षण तमिळनाडूमधील आदिविनायकाच्या मूर्तीला तंतोतंत लागू पडतं. त्याचप्रमाणे गणेशपुराण या नावाने प्रचलित उपपुराणातील विनायकाची कथा त्याला अनुरूप अशीच आहे.

गणेशपुराणातील विनायक

विनायक या गणपतीच्या एका अवताराची कथा गणेशपुराणात आलेली आहे. क्रीडाखंड या नावाने उल्लेख असलेल्या या पुराणाच्या उत्तरार्धातील पहिल्या भागात ज्या विनायकाचं वर्णन आहे, तो कश्यप व आदितीचा पुत्र आहे. प्रचलित माहितीनुसार, विनायक हा शंकर व पार्वतीचा पुत्र मानला जातो; परंतु गणेशपुराणकाराने या समजुतीला धक्का देणारी माहिती देऊन विनायक हा ब्राह्मणपुत्र आहे. असं ठोकून दिलं. त्यामुळे त्याला हत्तीचं मस्तक असण्याचं काही कारण नाही. त्याचं वर्णन करताना गणेशपुराणकार भृगु म्हणतो की, ‘ज्याचा अधरोष्ठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आहे, नासिका उंच आहे; भृकुटीच्या योगाने ललाट सुंदर आहे. जो दातांच्या दीप्तीने युक्त आहे; ज्याच्या देहकांतीने अंधकार नष्ट झाला आहे. व जो शुभ व दिव्य वस्त्रांनी युक्त आहे. अशा प्रकारच्या ह्या बालकास पाहून त्याच्या तेजाने ज्यांचे नेत्र दीपून गेले आहेत, असे त्याचे आईबाप काही एक पाहण्यास समर्थ झाले नाहीत.’ या वर्णनातून कुठेही विनायकाला सोंड असल्याचा उल्लेख येत नाही. सोंड नसलेल्या विनायकाच्या मूर्ति या आधारे बनवल्या असाव्यात.

आदिविनायक

विनायकाचं सर्वांत प्राचीन रूप या नात्याने दक्षिण भारतामध्ये आदिविनायकाची उपासना केली जाते. या विनायकाचं मुख हत्तीचं नसून मानवाचं आहे. त्यामुळे त्याला ‘नरमुख विनायक’ या नावानेही संबोधलं जात. गजानन आणि यानाइ मुगाथन इत्यादी गजमुख दैवतांच्या लोकप्रियतेच्याही आधीपासून हे दैवत अस्तित्वात होतं, अशी येथील विनायकाच्या उपासकांची श्रद्धा आहे. एवढंच नव्हे तर ‘गजमुख विनायकाच्या विरोधासाठी आपण या नरमुख विनायकाची उपासना करतो,’ असं त्यांचं म्हणणं आहे. महागुरू अगस्थियार या नावाने प्रकाशित होणार्‍या मासिकामध्ये या विनायकाच्या प्राचीन रुपाप्रती श्रद्धा व्यक्त करण्याकरिता तीन पवित्र जागा राखून ठेवण्यात येतात, असे म्हटलेले आहे.

या तीन जागांपैकी एक विश्वमाता स्वर्णवल्लीच्या पितृमोक्ष मंदिरासाठी असून दुसरी शिव मुक्तेश्वराच्या भिलाधायपाधी या तीर्थस्थळासाठी तसंच या शिवमंदिराबाहेरील आदिविनायकाच्या पुजास्थानासाठी तिसरी जागा राखून ठेवलेली असते.

थिलाधायपाधी

सेधलापाधी आणि कोविलपथ्थु या नावांनीही थिलाधायपाधी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. सथगुरू वेंकटरामण यांच्या लिखाणामधून या स्थळाला पितृमुक्ती मंदिर म्हणून सातत्याने संबोधलेलं आढळतं. त्यांनी आदिविनायक या शक्तिमान दैवताविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे.

त्यानुसार प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्वतः महागुरू अगस्थियार हे स्वतः शारीरिक किंवा सूक्ष्म रूपात या आदिगणेशाच्या पूजेकरिता थिलाधायपाधी या स्थळी येतात, अशी समजूत आहे.

ज्या लोकांना आपल्या पारिवारिक शांततेसाठी तसंच परस्परसंबंधातील सौख्य प्राप्तीसाठी कुठे जायचं असेल, त्यांनी थिलाधायपाधी येथील आदिगणेशाची पूजा करावी. हा गणेश मुलं व विद्यार्थी यांच्या स्मरणात राहील असा आहे, असे मानतात.

थिलाधायपाधी हे पवित्र क्षेत्र मायिलादुथुराई पेरलम या तीर्थक्षेत्राजवळ आहे. या जवळच माता सरस्वतीचं भव्य कुटनूर मंदिर तसंच माता ललिता हिचं भव्य थिरुमीयाचूर मंदिर आहे.

तमिळनाडूमधील इतर नरमुख विनायक

गजमुखाऐवजी नरमुख असलेली अनेकविनायक मंदिरे तमिलनाडूमध्ये आहेत. त्यापैकी एक मायावरमपासून ३० कि.मी.अंतरावरील मायावरम-कराईक्कुडी या रेल्वेमार्गावरील नंनिलम या रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या तिरूचेन्ह गट्टन्गुडी येथे आहे. विघ्नांतक या नावाने प्रसिद्ध असलेल्या या विनायकाचे मुख हत्तीऐवजी मनुष्याचं आहे. यामागे कारणीभूत अशी एक आख्यायिका येथे प्रचलित आहे. तीनुसार या विनायकाने गजमुखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. या विनायकाच्या आराधनेने सर्व विघ्ने दूर होतात,अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला विघ्नांतक हे नाव प्राप्त झालं,असं म्हणतात.

तामिलनाडूमधील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम या तालुक्याच्या गावी कुंभेश्वर या नावाने प्रसिद्ध असं शिवमंदिर आहे. चेन्नईपासून सुमारे ४०० कि.मी.अंतरावर असलेल्या या मंदिराच्या तिसऱ्या प्रकारात विनायकाची मूर्ती आहे. त्याला आदिविनायक या नावाने संबोधलं जाते. आदिविनायक हा शंकराच्याही आधीपासून अस्तित्वात होता,असं स्थानिक लोक सांगतात. आदिविनायकाची स्थापना ज्या अगस्थियार महागुरुने केली,असं मानलं जातं,ते अगस्ती या प्राचीन ऋषीचं नाव आहे.

अगस्ती ऋषी

ऋग्वेदात ज्याचा उल्लेख मान्य व मान्दार्य या पैतृक नावांनी येतो,तोच पुढे अगस्त्य या नावाने प्रसिद्धीस आला. मित्रावरुण व उर्वशी हे त्याचे माता-पिता. डॉ.दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी तो कुम्भापासून म्हणजे आदिवासींच्या मातृरूप दैवातांपासून जन्मला,असा निष्कर्ष काढलेला आहे. यावरून तो मूळ आदिवासी जमातींमधील होता,हे स्पष्ट होतं.

विदर्भ देशाची राजकन्या लोपामुद्रा ही त्याची पत्नी होती. आर्यांना त्यांच्या वसाहती वाढविण्याकरिता त्याने मदत केल्यामुळे तो त्यांना अतिशय प्रिय होता. तमिलनाडूमध्ये अगस्त्य ऋषीचा उल्लेख आदराने केला जातो. तो शिवाचा शिष्य तसंच अनेक विषयांत पारंगत असा विद्वान आणि अलौकिक शक्तीचा महर्षी होता असं तमिळ लोक मानतात. आर्य-द्रविड संघर्ष संपवून भारताला एकसंघ करण्यात त्याचं मोठं योगदान आहे,असं मानलं जातं. त्याची अनेक मंदिरे तमिलनाडूमध्ये आहेत. शक पूर्व ८०० हा त्याचा काळ डॉ.भांडारकर व इतर विद्वानांनी निश्चित केलेला आहे. अशा या अगस्त्य ऋषीने विना सोंडेच्या विनायकाची स्थापना केली असे परंपरा मानते.

संदर्भ :

१- मराठी विश्वकोश :४,पृ.८०६ .
२- २-www,agasthiar.org/a/adinmv/htm.
३-The Problem Of Ganapati,H.Heras,Indological Book House,Delhi.1972,Page 63;
४-लोकायत,देवीप्रसाद चटोपाध्याय,राजकमल प्रकाशन,प्रा.लि.दिल्ली,२००५,पृ.९९ ;
५-श्री गणेश कोश,संपा.अमरेंद्र गाडगीळ.श्रीराम बुक एजन्सी,पुणे.१९८१.पृ.२१२ व २१३;
६- भारतीय संस्कृती कोश,खंड पहिला,पृ.४७७;
७- मंगलमूर्ती गणेश,श्री.दा.सातवळेकर,स्वाध्याय मंडळ,किल्ला-पारडी,जि.सुरत,१९६२,पृ.२१ ८- श्री गणेश पुराण,संपादक व प्रकाशक श्री बालविनायक महाराज लालसरे,मोरगाव (जि.पुणे),१९७९,पृ.१९
_______________________________________________________

( ‘ गणपती देवता’ या आगामी ग्रंथामधून)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here