वाढत्या ब्लड प्रेशरला ताब्यात ठेवण्यासाठी औषधांपेक्षा हे बदल ठरतील जास्त उपयोगी!

0
279

हाय बीपी किंवा उच्च रक्तदाब ही समस्या हल्ली सर्वत्र पहायला मिळते. मधुमेहाच्या जोडीने उच्च रक्तदाब अनेकांच्या घरी वास्तव्यास असलेला दिसतो.हल्ली जमाना झटपट परिणामांचा असल्याने बीपी हाय झालं, की आपण डॉक्टर कडे जातो किंवा अनेकदा डॉक्टरकडे न जाताही केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेण्याचा प्रकार सर्रास चालतो.एका गोळीने काय फरक पडतो असं म्हणत, बिनबोभाट अनेक प्रकारची औषधं सहज घेतली जातात, बरं वाटलं तर उत्तमच, नाही वाटलं तर जायचं पुन्हा डॉक्टरकडे.एकाचा गुण नाही आला की दुसरा, दुसरीकडे नाही आला की तिसरा असं करता करता, ह्या दुष्टचक्रात अडकून आपण आपलं शरीर म्हणजे नानाविध औषधांचं भांडार करून टाकतो, मग अर्थात त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.आपल्या आजाराचं मूळ बहुतेक करून आपल्या जीवन शैलीत झालेला बदल असतो, आपल्या कामाच्या वेळा, झोपण्या-उठण्याच्या, खाण्या-पिण्याच्या वेळा ह्यात होत राहणारा सततचा बदल एका विशिष्ट पातळीनंतर शरीराला झेपेनासा होतो आणि आपण आजारी पडतो.अशावेळी डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्याइतकंच आवश्यक असतं, आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करणं.हाय बीपीचा त्रास होऊ नये, बीपी नियंत्रित राहावं ह्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काय काय बदल करणं गरजेचं आहे ते बघूया.  आहारातील बदल   ;- आपल्या आहारात भरपूर भाज्या, धान्य आणि फळांचा समावेश करून तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता, आहारात चरबीयुक्त आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. वजनावर नियंत्रण ;-अनेकदा आपले वाढते वजनही आपल्या कमी होणाऱ्या रक्तदाबाला कारणीभूत ठरते, त्यामुळं अतिरिक्त वजन कमी केल्याने रक्तदाब कमी व्हायला किंवा नियंत्रित रहायला मोलाची मदत होऊ शकते. नियमितपणे आणि योग्य व्यायाम केल्याने वजन,तर कमी होतेच शिवाय शरीराचे कार्य सुरळीत राहायला मदतही होते.रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबरच इतरही आजार नियमित व्यायामाच्या सवयीमुळे सहज टाळले जाऊ शकतात. जेवणातील मिठाचे प्रमाण ;- रक्तदाब वाढवण्यात मिठाचा मोठा वाटा असलेला दिसून येतो. आपल्या शरीराला मीठ आवश्यक आहे, परंतु हे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे.रोजच्या आहारात एका लहान चमचाभर मिठापेक्षा जास्त प्रमाणात मीठ घेता कामा नये. त्यामुळे बाहेरचं खातानाही हा नियम कायम लक्षात ठेवत, आपण जो पदार्थ खातोय त्यात मिठाचे प्रमाण किती आहे हे आवर्जून तपासून पहायला हवे. ताण- तणावाचे नियोजन ;- तुमच्या कामातील अतिरिक्त ताण देखील तुमचा रक्तदाब वाढण्यास कारण ठरू शकतो, त्यासाठी मानसिक ताणावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा.त्यासाठी तुम्ही, प्राणायाम, योगासने, ध्यान धारणा इत्यादी मार्गांचा अवलंब करू शकता किंवा ज्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आंनद मिळेल असे छंद जोपासा. आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. मद्यपान आणि धुम्रपान ;- व्यसन कोणतंही असो ते धोकादायकच. त्यामुळे आहारात मद्यपान करणे कटाक्षाने टाळले पाहिजे, किमानपक्षी मात्रा कमी तरी केलीच पाहिजे.शिवाय धूम्रपान केल्याने रक्तदाबावरचे नियंत्रण जाऊन हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते त्यामुळे, धूम्रपान करणे टाळावे, ह्यासाठी काय करता येईल ह्याबद्दल तज्ञ डॉक्टर आपली मदत करू शकतात.  उत्तेजक पेये ;- गेल्या काही काळात, चहा किंवा कॉफी हा आपल्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनले आहेत, परंतु त्याचा अतिरेक तर होत नाहीये ना ह्याचे भान ठेवणे अतिशय आवश्यक आहे.चहा किंवा कॉफी जास्त प्यायल्याने आपल्या शरीरात त्यातल्या तरतरी आणणाऱ्या घटकाची मात्रा वाढून आपला रक्तदाब वाढू शकतो. अशावेळी असल्या पेयांचे सेवन मर्यादित ठेवावे, कारण त्यांचा अतिरेक नुकसानदायक ठरू शकतो. पुरेशी झोप ;- हल्ली दिवसाच्या चोवीस तासांमध्ये कामाचे तास जास्त आणि झोपेचे तास कमी, अशी काहीशी अयोग्य विभागणी झालेलं सगळीकडे दिसून येते, मात्र ह्यामुळे शरीरावर अतिरीक्त ताण येतो आणि परिणामतः रक्तदाब अनियंत्रित होतो.अशावेळी शरीराला पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. दिवसातील चोवीस तासांपैकी सात तासांची नीट झोप ही शरीराचे दैनंदिन कार्य सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असते, त्यात तडजोड करू नये.आहार आणि जीवनशैलीत केलेला थोडासा बदल तुम्हाला निरोगी आयुष्य देईल ह्यात शंका नाही. औषधं तात्पुरता परिणाम दाखवतात, परंतु योग्य आहार आणि त्याला पूरक अशा जीवनशैलीचा स्वीकार केल्याने आजारावर दीर्घकाळ नियंत्रण मिळविता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here