तू काय ‘ धीरूभाई अंबानी ‘ लागून गेला काय ! असं आपण उगाच नाय म्हणत..

0
278

एक तरूण बेरोजगारी अंगावर झेलत गुजरात मधल्या एका छोट्याश्या खेड्यातून पायपीट करून मुंबईत आला. तिथं त्याने रोजगार शोधायला सुरुवात केली. आधी मिळेल ते काम करणं सुरू केलं.

उदाहरणार्थ म्हणजे, फळभाज्या विकणे, छोट्या मोठ्या गरजेच्या वस्तू कमी पैश्यात घेऊन जास्त मध्ये विकणे किंवा पेट्रोल पंपावर कामाला असणे. अश्या अनेक प्रकारची कामे मिळू लागली. खचून न जाता उलट उभारी घेऊन तो लढत गेला. पुढे त्याचे विचार सशक्त झाले. विचारामध्ये सकारात्मकता आली.

एकदा त्याच्या डोक्यावरून भर्रकन एक विमान गेलं. सर्वसामान्य व्यक्तीला काय वाटणार ? की त्यात एकदा तरी बसावं; पण त्यानं विचार केला की माझ्या डोक्यावरून जाण्याऱ्या विमानात मला बसायचं नाही. तर ते विमानच माझं करायचं आहे. म्हणजे त्याचा मालक व्हायचं आहे. त्याचे विचार अगदी योग्य दिशेने प्रवाहित होत होते.

आपण जसं मनात आणतो. मग ते ध्यानात घेऊन जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्याचं फळ अवश्य मिळतं. त्याच्या बाबतीत तही अगदी तसच झालं. त्यानं हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करायचा ठरवला. काम सुरू केलं. आणि अल्पावधीतच त्या व्यवसायाचं खूप मोठ्या व्यवसायात रूपांतर झालं आणि तो व्यक्ती देशाचाच नाहीतर जगातला श्रीमंत उद्योजक बनला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं कुणाची गोष्ट ? टाटा, बिरला की अजून कोण ?

यांच्याच रांगेत असणारा पण नेहमी आपल्या कौशल्याने प्रसिद्ध उद्योजक म्हणून ख्याती मिळवणारा एक दिवंगत भारतीय धीरूभाई अंबानी ! आज धीरूभाई अंबानी आपल्यात नसले तरी त्यांनी निर्माण करून ठेवलेलं काम हे अनंत काळातही न मरणारं आहे.

“बडा सोचो, तेजीसे सोचो, आगे का सोचो ” असं म्हणणाऱ्या, डोंगराएवढं काळीज असणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंम्बर १९३२ ला गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावात बनिया कुटूंबात झाला. त्यांचे वडील हिराचंद अंबानी शिक्षक होते आणि आई घरचे सगळी कामे आणि मुलांकडे पहायची. धीरूभाई यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. लहानपणीपासूनच आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे असं त्यांना वाटायचं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ! ते यशस्वी उद्योजक बनण्यासाठी असं म्हंटल तरी हरकत नाही. शाळा संपल्यावर त्यांनी समोसे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि इथेच खरी सुरुवात झाली.

पैसे कमवायला कुणाच्या निमंत्रण देण्याची काही गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. दहावी झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. पुढे वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे आर्थिक जबाबदारी सगळी धीरूभाई अंबानी यांच्यावरच येऊन पडली. त्यामुळे त्यांनी पेट्रोल पंम्प वर काम करायला सुरुवात केली. तिथे काम केल्यानंतर नव्या कामाच्या शोधात ते “यमन” देशात कामासाठी गेले. तिथं क्लार्क ची नोकरीच्या संधीचं धीरूभाई यांनी सोनं केलं. तिथल्या लोकांना नेतृत्वगुण आणि काम खूप आवडलं.

तिथं व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या. अनेक देशातील लोकांसोबत ओळखी करून घेतल्या. १९५४ मध्ये त्यांचं लग्न कोकिलाबेन यांच्याशी झालं. याच काळात त्यांचं प्रमोशन झालं. तिथंच त्यांनी स्वतःच्या जीवावर, मोठी ऑइल निर्माण करणारी कंपनी टाकायची असं ठरवलं. आणि पुढे ते सत्यात उतरवलं. १९५७ पाहिलेले अनेक स्वप्न साकार करण्यासाठी ते पुन्हा भारतातल्या मुंबईत आले. ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५०० रुपय होते. १९५८ पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी रिलायन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करून काम सुरू केलं. आणि बघता बघता सर्व देश कामाच्या व्यापाने भरून गेला.

धीरूभाई यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या. मुलं अनिल आणि मुकेश तर मुली नीना आणि दीप्ती. काम यशाचं शिखर गाठत होतं पण त्यांची अडचण वाढली. त्यांना पॅरालिसिस चा अटॅक आला. पण हरणार ते धीरूभाई कसले. त्यांच्या विचारानुसार त्यांच्या मुलांमार्फत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि सगळीकडे रिलायंस इंडस्ट्रीचं क्षेत्र वाढतच गेलं.आज अंबानी कुटुंब जगातील एक खुप मोठं कुटुंब म्हणून मानलं जातं. त्यांच्या उद्योजक कल्पकतेला सलाम. आजही अनेक लोकं त्यांचा आदर्श घेऊन आपलं काम सुरू करतात. एका मोठ्या विचारणांवर मोठा होणाऱ्या उद्योजक धीरूभाई अंबानी यांना आदर सलाम !..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here