बारामती: परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळं पिकांचं आतोनात नुकसान झालं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार आपल्या बारामतीच्या गोविंद बाग या निवासस्थानावरुन हेलिकॉप्टरने तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. पवार आज आणि उद्या मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा आणि उस्मानाबादमधील भागांना भेट देत, झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यांत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेलं सोयाबीन डोळ्यादेखत वाहून गेलं. तर काही ठिकाणी सोयाबीनला बुरशी लागली, मोड फुटू लागले आहेत. पांढरं सोनं म्हणवणाऱ्या कापसाचंही मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकरवरील उभा ऊस आडवा झाला आहे. त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. खरिपाच्या पिकांवर पाहिलेली स्वप्न मातीमोल झालेली या शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळं सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार न पार पाडता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे प्रशांत बंब यांनी पत्रात म्हटले होते.