( जामनेर -प्रतिनिधी ) तालुक्यातील भारत निर्माणव जलस्वराज योजना 60 ते 70 गावांच्या पाणीपुरवठा योजना दहा वर्षे पासून पूर्ण होऊ शकल्या नाही. या संपूर्ण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून या बाबत जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांना या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे भेट घेऊन या योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याची मागणी केली . त्यांनी ना. मुश्रीफ यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की जामनेर तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून 60 ते 70 गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यातील फक्त 10 ते 12 गावांचा योजना काही प्रमाणात पूर्ण आहेत मात्र भारत निर्माण व स्वजलधारा अशा पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून या संपूर्ण योजना अजूनही अपूर्णावस्थेत पडल्या आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने योजना पूर्ण दाखवून निधी काढून घेतला आहे. त्यामळे आज ही अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. या योजनेमध्ये कोटयावधीचा गैरव्यवहार झाला असून शासनाच्या पैशांची ठेकेदारांनी लूट केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या ठेकेदारांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचे लाइसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणीही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे किशोर पाटील यांनी केली आहे. या पत्राची तात्काळ दखल घेत ग्राम विकास मंत्री ना. मुश्रीफ यांनी जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामूळे ठेकेदारांमध्ये खळबळ ऊडाली आहे.