आदिवासींची प्रदूषणमुक्त दिवाळी ——————————————— डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

0
74

 

आदिवासींची प्रदूषणमुक्त दिवाळी
———————————————
डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण मानला जातो व त्याचा दिव्यांशी असलेला संबंध अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे फटाके फोडणे म्हणजे दिवाळी साजरी करणे अशीही एक समजूत आहे. गोड-धोड करून खाणे,नवे कपडे खरेदी करणे,धनतेरस,गाय-गोऱ्याची बारस, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे दिवाळीतील सण गरीब व श्रीमंत अशा दोन्ही आर्थिक स्तरांमधील लोक साजरे करीत असतात. परंतु,आदिवासींच्या दिवाळी उत्सवात मात्र शहरी दिवाळीप्रमाणे फटाक्यांना महत्व नाही,तर निसर्गाची पूजा करणे हाच त्यांच्या दिवाळीचा महत्वाचा भाग आहे. फटाक्याशिवाय साजऱ्या होणाऱ्या आदिवासींच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणता येईल. कारण की, कोणत्याही प्रबोधनाशिवाय वर्षानुवर्षे फटाके न फोडता म्हणजेच प्रदूषण न करता आदिवासी जमाती दिवाळीचा सण साजरा करतात.

आदिवासी जमाती

जगातील सर्वच संस्कृतींमध्ये अनेक सण-उत्सव आहेत,पण त्यांचे मूळ स्वरूप शोधायचे झाल्यास त्या-त्या संस्कृतीतील आदिवासींच्या संस्कृतीचा शोध घावा लागतो. कारण की,जगातील सर्वच प्राचीन संस्कृतींचे मूळ स्वरूप अजूनही आदिवासी जमातींनीच जपलेले आहे. हाच न्याय भारतीय संस्कृतीलाही लागू आहे. येथील सण-उत्सवांचे मूळ रूप आदिवासींच्या प्रथा-परंपरांमध्ये आढळून येते. महाराष्ट्रात भिल्ल, टोकरे कोळी, माडिया-गोंड, कोळी महादेव, इत्यादी प्रमुख जमाती आहेत. पावरा, ठाकर, वारली या आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत. राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत आणि आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात धुळे, नंदूरबार, पालघर, अहमदनगर(अकोले), पुणे,नाशिक व ठाणे (सहयाद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे. भौगोलिक भेदांप्रमाणे त्यांचे राहणीमान,प्रथा-परंपरा तसेच त्यांच्या भाषासुद्धा वेगवेगळ्या आहेत. परंतु,त्यांच्या सणांमध्ये आढळणारी समान गोष्ट म्हणजे निसर्गाविषयी त्यांची असलेली जवळीक. त्यांची दिवाळीसुद्धा निसर्गपूजेला प्राधान्य देणारी आहे. तिचे स्वरूप कसे आहे याचा थोडक्यात परामर्श याठिकाणी घेऊ या.

आदिवासींची गावदि‌वाळी

गावदिवाळी म्हणजे मनसोक्त आनंद लुटणे होय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावरा व भिल्ल आदिवासी जमातींमध्ये गावदिवाळी साजरी केली जाते. या दिवाळीचा हेतू गावावरील येणारी आपत्ती टळावी हा असून त्यासाठी निसर्गाची पूजा करण्यात येते.

सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील ‘डाब’ हे गाव आदिवासी संस्कृतीचे उगमस्थान मानले जाते. राजापांठा,गांडा ठाकूर,याहामोगी,पांडोरी माता ही या परिसरातील आदिवासींची आराध्य दैवते होत.या दैवतांशी निगडित आदिवासींचे होळी आणि दिवाळी हे प्रमुख सण आहेत. या दोनच सणांना आदिवासींमध्ये महत्वाचे स्थान आहे. गावदिवाळीचा सण आदिवासींचे आद्यपुरुष राजा पांठा आणि गांडा ठाकूर यांच्यामुळेच ‘डाब’ या गावात सुरू झाला असे आदिवासी मानतात. हे दोन महापुरुष आपल्या राज्याचा फेरफटका मारीत असता मारायला निघत आणि ज्या गावात मुक्काम करीत,तेथे आनंदोत्सव साजरा केला जात असे. त्यालाच गावदिवाळी म्हटले गेले.

आदिवासी जमातींमध्ये नरबळीची प्रथा पूर्वी होती. एकदा हे दोघे एका गावात मुक्कामी असताना त्यांच्या उपस्थितीत नरबळी दिला जात होता. तेव्हा आम्हाला हा मान द्यावा म्हणजेच आमचं बळी द्यावा,अशी विनंती दोघांनीही केली. त्यामागे ही प्रथा बंद व्हावी हाच हेतू होता. तो साध्य होऊन बळी जाणारी वृद्ध व्यक्ती वाचली आणि यापुढे नरबळीऐवजी रेड्याचा बळी द्यावा असे फर्मान त्यांनी काढले.

गावदिवाळीचे स्वरूप कालांतराने बदलले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले अस्तंबा हे सातपुड्याच्या कुशीत असलेले समुद्र सपाटीपासून चार हजार फूट उंचीवरील ठिकाण ‘अश्वत्थामा ऋषींचा डोंगर’ या नावानेही ओळखले जाते. हे आदिवासी भाविकांचे श्रद्धास्थान मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात येथे मोठी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. येथील यात्रेचा समारोप लक्ष्मीपूजनाच्या रात्री होतो. त्यानंतर या डोंगराच्या पायथ्याशी याच दिवशी गावदिवाळीचा सोहळा पार पडतो. त्यानंतर सलग चार महिने हा उत्सव विविध गावांमध्ये साजरा केला जातो. या उत्सवात करमणुकीचे अनेक कार्यक्रम होतात. ज्या गावात गावदिवाळी असते,त्या गावातील मुली आपल्या माहेरी येतात. त्याचबरोबर गावातील लोकांचे आसपासचे नातेवाईकसुद्धा या सोहळ्यात सहभागी होतात. सारेजण नवीन कपडे यावेळी धारण करतात.

दिवाळीचा देव गावाबाहेर असलेल्या झाडाझुडपातच असतो. गावाच्या सीमेवर आदिवासींचे बाघदेव, डोंगऱ्यादेव, शिवाऱ्यादेव असतात. त्या सर्वांची एकत्रित पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर गावाचा पाटील किंवा प्रमुखाच्या हस्ते रेडा किंवा कोंबड्याची मान कापली जाते. देवाला ती अर्पण करून उरलेले मांस हे गावात प्रसाद म्हणून वाटले जाते. गावातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी नाना प्रकारची सोंगे घेणारे कलावंत आपली कला सादर करतात. रात्रभर आदिवासी गीते, नृत्य आणि आदिवासी संस्कृतीवर आधारित नाटकेही सादर केली जातात. यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या कलावंतांचा खर्च गावातील लोक वर्गणी गोळा करून करतात.

मेळघाटातील घुंगरू बाजार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्यात कोरकू आणि गोंड या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. विदर्भातील लोकप्रिय असे हे पर्यटनस्थळ निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. येथील गोंड (थाट्या) जमातीचे लोक लक्ष्मीपूजनानंतरच्या दुसऱ्या दिवशी समूहाने बाजारात पारंपरिक वेष धारण करून आणि घुंगरू पायात घालून नृत्य करतात. दिवाळीच्या काळात मेळघाटातील गावागावात भरणाऱ्या बाजारहाटांनाच ‘घुंगरू बाजार’ या नावाने संबोधले जाते. या बाजारांमध्ये घुंगरूंचा नाद निनादत असल्यामुळे त्याला हे नाव प्राप्त झाले. वर्षभर भरणाऱ्या बाजारात हे दृश्य पाहायला मिळत नाही. यावेळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून नृत्य करणारांना भेटवस्तू दिल्या जातात. आदिवासींना आपले जीवन अतिशय प्रतिकूल अवस्थेत जगावे लागते. घनदाट अरण्य आणि वन्य श्वापदांचे संकट अशा कचाट्यात सापडलेला आदिवासी आपला आनंद निसर्गातील अनुकूल घटकांमध्येच शोधतो. त्याचप्रमाणे प्रतिकूल घटकांना अनुकूल करण्याचा प्रयत्नही करतो. त्याच्या केंद्रस्थानी केवळ अरण्यच असते. या पार्श्वभूमीवर ढोल,बासरी आणि घुंगराची किणकिण यांच्यामुळेच त्यांची दिवाळी साजरी होते. त्यासाठी त्यांना कृत्रिम आणि कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाची गरज नसते.

पांढरे धोतर व त्यावर पांढराच सदरा,डोक्यावर रंगीत पगडी आणि पगडीवर पक्षांच्या रंगीत पिसांचे तुरे तसेच अंगात चढवलेला कोट असा पेहेराव. दोन्ही हातांना शंखांची मोठी माळ आणि हातात साधारणपणे तीन फूट लांब बासरी,गळ्यात लटकविलेली ढोलकी तसेच पायाला घुंगरांच्या तोड्या अशा पारंपरिक वेशभूषेत आलेले आदिवासी शिस्तबद्ध रीतीने समूहाने नृत्य करतात. घुंगरू बाजारात असे दहा-बारा समूह नृत्यमग्न असताना त्यांच्यापैकी दोन-तीन आदिवासी हातात झोळी घेऊन बाजारात व्यापाऱ्यांकडे दिवाळीची भेटवस्तू मागत असतात. भाजीपाला विकणारा आपल्या जवळची भाजी,बांगड्यांच्या दुकानातून बांगड्या,सौंदर्यप्रसाधनाच्या दुकानातून बिंदी,अंगठी तसेच इतर दुकानांमधून जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्या जातात. मेळघाटातील धारणीपासून सुरू झालेला हा बाजार हरिसालच्या आठवडीबाजारापर्यंत चालू असतो. त्याचप्रमाणे मेळघाटातील कळमखार,बिजूधावडी, टिंटंबा, देठतलई, बैरागड, सेमाडोह, हरिसाल काटकुंभ, चुर्णी, हतरू इ.दुर्गम गावांमध्येही घुंगरू बाजार आयोजित करण्यात येतात. आसपासचे आदिवासी बांधव या बाजारात आनंद लुटण्याकरिता सहभागी होतात.

पुरणपोळी व फटाक्यांविना आदिवासींची दिवाळी

ठाणे व पालघर हे कोकणातील आदिवासी जिल्हे. येथील वारली,कोकणा,महादेव कोळी,मल्हार कोळी,कातकरी,क-ठाकर व म-ठाकर इ.जमातींमध्ये दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस साजरी करतात. यावेळी आपल्या कुलदैवतांची पूजा करून पारंपारिक तारपा नृत्य सादर करतात. आदिवासी जमातींमध्ये वाघ बारस या नावाने हा सण साजरा होतो. यादिवशी आपल्या घरात गाईचा प्रवेश होणे म्हणजे लक्ष्मी घरात येणे होय,अशी त्यांची श्रद्धा आहे.

शहरातील दिवाळीप्रमाणे दिव्यांची आरास आदिवासी करीत नाहीत किंवा ते तेलकट पदार्थही खात नाहीत. शेणा-मातीपासून एक दिवा तयार करून तो घरासमोर तसेच दाराच्या भिंतीवर लावतात.त्यात रानफळांपासून केलेली पणती ठेवून तीमध्ये वात पेटवितात. घरात शिरताना गाईच्या खुरांनी शेणाच्या दिव्याला स्पर्श झाला की ते शुभ मानले जाते. स्वयंपाकासाठी पुरणपोळी करण्याची प्रथा आदिवासींमध्ये नाही. रानभाज्या आणि तांदळापासून बनविलेले पदार्थ यादिवशी ते खातात.कंद-मुळे आणि शेंगांपासून बनविलेल्या या पदार्थांना काकडोळ्या म्हणून संबोधले जाते. हिरवादेव आणि वाघोबादेव ही त्यांची दैवते आहेत. यांच्यासोबतच घरात आलेल्या धान्याचीही पूजा या सणात केली जाते.
गुजरातमधील वाघबारान हा वाघबारस या आदिवासींच्या सणाचा नागर समाजातील अवशेष होय. वाघदेव आदिवासींमध्ये पूजनीय आहे . वाघावर देवी बसून हिंडत असते म्हणून त्याची पूजा केल्याने तो आपणास त्रास देणार नाही, अशी त्यांची धारणा आहे. वाघ खऱ्या अर्थाने जंगलाचा राजा आहे. म्हणून त्याच्या योग्यतेमुळे त्याला या दिवशी वाघदेवाजवळ कोंबड्याचा बळी देतात. नवं धान्य पेरण्यापूर्वी कोंबडीच्या रक्ताने माखवून बी पेरतात. त्याला बी वाटवणे म्हणतात. नंतर ती कोंबडी खातात. त्या दिवसापासून वाघबारशीपर्यंतच्या चार महिन्यांत (आषाढ ते आश्‍विन) कोंबडे खात नाहीत. आदिवासींचा चातुर्मास कोंबडी बंदीवर चालतो.

नागपंचमीला आदिवासी शिकण्यास सुरुवात करतात. तिची पूर्तता वाघबारसीला करतात. त्यासाठी सिदाच्या (आपट्याच्या) बुंध्याजवळ गुरू तांदळाच्या पाच पुंजळ्या (पुंजके) घालतो व नारळ पाच खाजे कोंबडा चढवतो. मग चेल्याला (शिष्याला) जवळ बसवून त्याच्याकडून आजपर्यंत शिकवलेली विद्या सर्व मुखोद्गत केलेली असते. तिची संपूर्ण आवृत्ती करवतो. चुकीची दुरुस्ती करवतो. कोंबडं मारून त्याचे रक्त चेल्याच्या कपाळाला लावतो, त्याला टिळा देणे म्हणतात. उजव्या तळहाताला त्याच रक्ताचा गरका देतो. तेथे आलेले काही लोक या विधीकार्याचा स्वयंपाक करतात व हे कोंबडे मारलेलं जेवण करतात. नंतर घरी येतात. घरीही वाघदेवाचे कोंबडे शिजवून तयार असते. त्यातीलही थोडा प्रसाद म्हणून इतरांबरोबर ते खातात. या दिवशी गुराख्याला उपवास करावा लागतो.’

अशी वाघबारस या आदिवासींच्या सणाची माहिती गं.जा.आवारी यांनी (संदर्भ : वाघबारस (गोवत्स द्वादशी) आणि सर्वपित्री, आदिवासींचे उत्सव, पृ.१०४) दिलेली आहे. याविषयी पुढे विस्ताराने ते सांगतात –

“ वाघदेवाचे कोंबडे मारून आणल्यानंतर काही मुले न जेवताच परगावी जाऊन तांदूळ व दूध मागून आणतात. त्यासाठी मखमलीच्या (झेंडू) फुलांच्या माळा घालतात, कानाला व टोपीलाही फुले खोचतात आणि ‘वाघ्याची भा…यरे दूधभात खायरे’ असं प्रत्येक घरी ओरडून तांदूळ जमवतात. बरोबर तांब्या घेतलेला असतो. ज्या घरी वासरू बांधलेलं दिसेल त्या घरी दूध मागतात. त्यासाठी ‘वाघ्याची भायरे दूधभात खायरे (वासरू असल्यास), तांब्याला आसरा घरी दोन वासरा (वासरे) ’ अशी त्या घरमालकाला सूचना देतात. तेथे थोडेफार दूध मिळते, ते दूध व तांदूळ घेऊन गावी येऊन जेवण करतात. असे चार-दोन गावाचे आणलेले तांदूळ संध्याकाळी गावाबाहेर शिजवतात. त्यात मागून आणलेलं दूधही घालतात. त्यातलंच थोडं दूध शिल्लक ठेवून त्यात इतर गावाहून आणलेल्या तांदळातच त्या गावातून घरोघरचा मागितलेला तांदूळही असतोच. हा दूधभाताचा नैवेद्य वाटावयाचा असतो.

मग तीन दगड आणतात. त्यापैकी एकावर शेंदराने वाघाचं व दुसऱ्यावर नागलीच्या पिठाने गायीचं चित्र काढतात. मग तीन गुराखी बोलवून कोळी जातीच्या गुराख्याजवळ वाघाचं, वार्ल्याजवळ भालूचं, कोकण्याजवळ गाईचं चित्र असलेले दगड देऊन ज्या क्रमाने ते दिले त्या क्रमाने ते रानात नेऊन ठेवतात. नंतर त्यांना स्नान करून परत येण्यास सांगतात. मात्र तिकडून येताना त्यांनी उलट्या क्रमाने यावयाचं असतं. ते येईपर्यंत गावातील लोक गावाच्या वेशीजवळ घरातील कुटीर (शाकारलेले जुने गवत) व इतर गवत आणून पेटवतात. त्यातून उडी मारून तेथे असलेल्या लोकातील उत्साही मंडळी चालत जातात. हा कार्यक्रम आटोपल्यावर स्नान करून आलेल्या गुराख्यांना अंगावर कपडा टाकून झाकून ठेवून दूधभाताचा प्रसाद इतरांनी खाल्ल्यावर गवताच्या जाळलेल्या राखेची मसेरी गाईच्या रस्त्यावर पसरवून देतात. तेथे गाई आणतात. त्यांच्यावर मागून आणलेलं शिल्लक ठेवलेलं दूध झेंडूच्या फुलाने शिंपडतात. मग त्या झाकून ठेवलेल्या गुराख्यांना कोणी एखादा शहाणा माणूस अनुक्रमे वाघ, भालू व गायवाल्याला विचारतात ते असे –

१) वाघाला : वाघोबा, हे रान सोडून जाशील की नाही? – उत्तर : जाईन
२) भालूला : भालूबाई, हे रान सोडून जाशील की नाही? – उत्तर : जाईन
३) गाईला : गाई, गाई हे रान चरून येशील की नाही? – उत्तर : येईन

असा एकेक प्रश्न पाच-पाच वेळा विचारावयाचा. त्यांची उत्तरंही पाच-पाच वेळा मिळायची. मग तो नैवेद्य त्यांना प्रथम देऊन नंतर इतरांनी तो घ्यावयाचा. हा बारा घराचा प्रसाद विशेष पवित्र मानला जातो. पण तो कुत्र्याला घालीत नसतात. कारण तो जर कुत्र्याने खाल्ला तर त्यास वाघ निश्चितपणे पकडेल, अशी समजूत आहे.

यवतमाळ जिल्ह्यामधील कोलाम आदिवासी हे दिवाळीच्या दरम्यान ‘दंढार’ हे त्यांचे पारंपारिक नृत्य गावोगावी सादर करतात. स्त्रियांच्या वेषात डोक्याला गंगावन आणि त्यात खोवलेली फुलं,डोळ्यावर गॉगल व पायात घुंगरू बांधून पुरुष कोलाम पोडापुढे किंवा ग्रामदैवतापुढे डफडे आणि ढोलकीच्या नादावर नाचतात. दिवस-रात्रभर त्यांचे हे नृत्य चालू असते. त्यांचे दैवत लक्ष्मी नसून हिडींबा माता आहे.

गोवारी आदिवासींचे दैवत ढाल आहे. तीस ते चाळीस फूट लांब बांबूवर तीन ते चारमुखी ढाल उभारण्यात येते. घरोघरी ही ढाल नेण्यात येते. ढालपूजन हा त्यांच्या दिवाळी उत्सवाचा मुख्य भाग असतो. अशा अनेक पद्धतींनी आदिवासींच्या विविध जमातींमध्ये दिवाळी साजरी होते. गायीप्रमाणेच म्हशींचेही पूजन यावेळी केले जाते. नागरी दिवाळीपेक्षा ही दिवाळी निश्चितच आगळी-वेगळी आहे.

नागरी दिवाळीतील विसंगती-लक्ष्मी बॉम्ब

शहरात राहणारे लोक सुसंस्कृत असतात अशी एक समजूत आहे. म्हणूनच सुसंस्कृत या शब्दासाठी हिंदी भाषेत ‘शहरी’ हा शब्द प्रचलित आहे. ‘नागरिक’ हा शब्दही याच अर्थाचा वाहक आहे. अशा नागरिकांमध्ये प्रचलित असलेल्या दिवाळी सणामध्ये फटाक्याला अतिशय महात्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनानंतर ‘लक्ष्मी छाप’ फटाक्याची पूजा करून नंतर ते फटाके फोडण्यात येतात. इतर फटाक्यांपेक्षा अधिक आवाज करणारा म्हणून हा फटाका प्रसिद्ध आहे. परंतु,ज्या लक्ष्मीची पूजा केली जाते,तिच्याच प्रतिमेच्या चिंधड्या उडविल्या जातात हे हा सण साजरा करणाऱ्या तथाकथित शहरी लोकांच्या ध्यानी-मनीही नसते. अलीकडे काही तथाकथित धर्मारक्षकांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी कोणत्याही देवतांच्या प्रतिमा फटाक्यांवर असू नये अशी मागणी केली. त्यानुसार काही फटाका कंपन्यांनी आपल्या उत्पादनावर देवतांची चित्रे ठेवणे बंद केले.

गेल्या महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज झालेल्या अक्षयकुमार आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव बदलविण्याकरिता काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी धमकी दिल्यावर त्याचे नाव बदलून केवळ ‘ लक्ष्मी’ असेच ठेवण्याचा निर्णय दिग्दर्शक व निर्मात्यांनी घेतला. अशा अनेक सिनेमांना फटाके लावणाऱ्या संघटना आता सक्रिय झाल्या आहेत.

फटाके,प्रदूषण व कायदा

फटाके फोडल्यामुळे जसे ध्वनी प्रदूषण होते,तसेच प्रदूषणही होते. आवाज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा आवाज न करणारे म्हणजेच शोभेचे फटाके अधिक प्रदूषण करतात. फायरक्रॅकर्स मध्ये सल्फरचे घटक अधिक असतात. बंडर्स,स्टेबिलायझर्स,ऑक्सिडायझर्स कमी करणारे घटक आणि रंग अशा फटाक्यांमध्ये राहतात. रंगीत दिवे तयार करणाऱ्या फटाक्यांमध्ये अँटीमोनी सल्फाइड,बेरियम नायट्रेट, अॅल्युमिनियम,तांबे,लिथियम आणि स्ट्रॉनटीयम यांचे मिश्रण असते. जेव्हा हे शोभेचे फटाके उडविले जातात, तेव्हा त्यातील बरीचशी रसायने हवेत मिसळली जातात.

त्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते म्हणजेच वायूप्रदूषण होते. दिवाळीचा सण ज्या काळात येतो, त्याकाळात हवेत धुके वाढलेले असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात हे फटाके भर घालीत असतात. त्यामुळे अल्झायमर आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांसारखे भीषण रोग लहान मुले आणि वयस्क व्यक्तींमध्ये निर्माण होऊ शकतात.

धडाम धूम आवाजाचे आकर्षण असणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढते. मनुष्याच्या कानामध्ये साधारणपणे ५ डेसिबल इतका आवाज सहन करण्याची क्षमता असते. परंतु,फटाक्यांचा सरासरी आवाज हा १२५ डेसिबल असतो. त्यामुळे असे फटाके फोडल्यानंतर अनेकांना कानाचे विकार बराच काळपर्यंत चालू असतात.

फटाके फोडल्यानंतर होणाऱ्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे आजार होतात. लहान मुले,वृद्ध आणि आजारी माणसांना फटाक्यांचा विशेष त्रास होतो. त्यामुळे रात्री दहा वाजतानंतर फटाके फोडण्यास शासनाने बंदी घातली आहे. जी व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करील तिला सहा महिने कारावासाची शिक्ष होऊ शकते. २००५ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभर हा कायदा अमलात आला. परंतु,त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही. १९७३मध्ये प्रसृत झालेल्या विस्फोटक नियमावली आणि विस्फोटक अधिनियम यांचे पालन नीटपणे केले जात नाही. या कायद्यानुसार जिथे आपण फटाके फोडतो, त्याठिकाणी १४५ डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतीचा ध्वनी निर्माण होता कामा नये, असे कायदा सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिलेला आहे. वास्तविक असे फटाके निर्माणच होऊ नये, असाही कायदा करायला हवा. तसा कायदा करून त्याची कठोरपणे अंमलबजावणी झाल्यास फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून आपण मुक्त होऊ शकू.

फटाक्याचा शोध व चीनची हडेलहप्पी

फटाक्यासाठी लागणारी बारूद जगात सर्वात आधी चीनमध्ये निर्माण झाली,म्हणून फटाक्याचा शोध चीनमध्ये लागल्याचे सांगण्यात येते. फटाके निर्मितीतही चीन हा देश आघाडीवर आहे. फटाक्यांची भारतातील बाजारपेठ चीनी फटाक्यांनी काबीज केली होती. त्याचा भारतीय व्यापाऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे चीनी फटाक्यांवर बंदी आणली गेली. तरीही नेपाळमार्गे चीनमधून फटाके येत असतात. सीमेवरील घुसखोरीप्रमाणेच हीही एक घुसखोरी भारताला जाचक ठरली आहे.

भारतीय फटाक्यांपेक्षा चिनी फटाके अधिक धोकादायक आह्रेत. संरक्षण व पर्यावरण या दोन्ही गोष्टींना त्यांच्यापासून धोका आहे. चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि पर-क्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो. एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा आणि हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. भारतात फटाक्‍यांची निर्मिती करताना पोटॅशिअम परक्‍लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे. तरीही चीनी फटाके बेकायदा मार्गाने भारतात आणण्याची हडेलहप्पी चीन करीत आहे.
_______________________________
ashokrana.2811@gmail.com 9325514277

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here