खडसेंच्या प्रवेशानंतरचा पहिलाच उत्तर महाराष्ट्र दौरा शरद पवारांकडून रद्द

0
151

खडसेंच्या प्रवेशानंतरच्या या दौऱ्याचं राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व असल्याचं समजलं जात होतं                                            राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतरच्या या दौऱ्याचं राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व असल्याचं समजलं जात होतं. यानिमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. पण हा दौऱा रद्द करण्यात आला असल्याचं वृत्त न्यूज १८ लोकमतने दिलं आहे.

शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपामधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. भविष्यात खडसे जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक परिसरात भाजपाला मोठे आव्हान निर्माण करू शकत असल्याने सर्वांचंच या दौऱ्याकडे लक्ष लागलं होतं.

मात्र अचानकपणे तीन दिवस आधी दौरा रद्द करण्यात आला आहे. यामागंच कारणही समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना करोनाची लागण झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे. रोहिणी खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी सारादेखील करोना पॉझिटिव्ह असून दोघींनाही जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.रोहिणी खडसे करोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला नियोजित दौरा हा तुर्तास रद्द करावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here