-
करोना महामारी आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे देशभरातील हॉटेल-रेस्तराँ तोट्यात गेले. अनलॉकनंतर रेस्तराँ पुन्हा सुरू झालेत, पण ग्राहकांचा अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पुण्याच्या एका रेस्तराँ मालकाने भन्नाट शक्कल लढवलीये. करोना काळात धंदा होत नसल्याने वडगाव-मावळमधील शिवराज रेस्तराँचे मालक अतूल वायकर हे देखील त्रस्त होते. ग्राहक फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि रोजचा खर्चही निघत नव्हता , अशात वायकर यांच्या डोक्यात एक ‘बुलेट आयडिया’ आली.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एक भन्नाट ऑफर आणली. जो कोणी जेवणाची स्पेशल ‘बुलेट थाळी’ पूर्ण फस्त करेल त्याला 1.65 लाख रुपयांची चकाकती नवीकोरी बुलेट गिफ्ट म्हणून दिली जाईल अशी ऑफर त्यांनी आणली आहे.स्पेशल बुलेट थाळी खाण्यासाठी काही अटी त्यांनी ठेवल्यात. मुख्य म्हणजे एकाच व्यक्तीला ही थाळी खावी लागेल. तसेच पूर्ण थाळी संपवण्यासाठी त्याला एक तासाचा वेळ मिळेल वायकर यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्तराँबाहेरच ५ नव्या बुलेट उभ्या केल्या आहेत. बाहेर उभ्या असलेल्या बुलेट बघून अनेकजण या हॉटेलमध्ये स्पेशल थाळी संपवून बुलेट जिंकण्यासाठी येतात पण थाळीत इतके पदार्थ असतात की खाता खाता त्यांना घाम फुटतो.द बुलेट थाळी एक नॉन-व्हेज थाळी आहे. यामध्ये 4 किलो मटण आणि फ्राय मच्छीचे जवळपास १२ पदार्थ असतात. 55 कर्मचारी ही थाळी बनवण्यासाठी काम करतात. यामध्ये फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला आणि कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ असतात.ऑफर आणल्यापासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे, तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन केलं जातं. दिवसाला ६५ थाळी संपतात असं वायकर यांनी सांगितलं.शिवराज हॉटेलमध्ये बुलेट थाळीव्यतिरिक्त पाच प्रकारच्या महाकाय थाळी मिळतात. यात विशेष रावण थाळी, मालवणी मच्छी थाळी, पहलवान मटण थाळी, बकासूर चिकन थाळी आणि सरकार मटण थाळी. बुलेट थाळीसह प्रत्येक थाळीची किंमत दोन हजार पाचशे रुपये (२,५००) आहे.शिवराज हॉटेलने यापूर्वीही अशीच एक स्पर्धा ठेवली होती. यामध्ये चार लोकांनी मिळून एका तासात आठ किलो रावण थाळी खाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी विजेत्याला 5000 रुपये रोख देण्यात आले तसेच थाळीचे पैसेही त्याच्याकडून आकारण्यात आले नाही.तर, बुलेट थाळी स्पर्धा सुरू झाल्यापासून ही महाकाय थाळी फक्त एकच व्यक्ती एका तासात पूर्ण खाण्यात यशस्वी ठरला आहे. सोलापूरच्या सोमनाथ पवार यांनी ही बुलेट थाळी एका तासात फस्त केली. त्या बदल्यात त्यांना लगेचच एक बुलेट गिफ्ट म्हणून देण्यात आली अशी माहिती अतुल वायकर यांनी इंडिया टुडेला दिली. दरम्यान, सोशल मीडियामध्ये ‘बुलेट थाळी’ची चर्चा सुरू झाल्यापासून बुलेट जिंकण्यासाठी शिवराज हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Home Uncategorized पुण्यातल्या हॉटेलमध्ये ‘बुलेट थाळी चॅलेंज’! तासाभरात फस्त केल्यास मिळणार Royal Enfield Bullet