दिल्ली पोलिसांची साडेचार वाजता पत्रकार परिषद नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. या रॅलीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या परवानगी रॅली काढण्याचा निर्णय दिला होता. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भात साडेचार वाजता पोलिसांकडून निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
२६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना यासंदर्भात निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे रॅली काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात पोलिसांकडून साडेचार वाजता महत्त्वाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे विशेष आयुक्तांनी (गुप्तचर) पत्रकार परिषद बोलवली असून, त्यावेळी माध्यमांना ट्रॅक्टर रॅली संदर्भात माहिती देणार आहेत.
“आमच्या मागण्यां सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला शांततेत ट्रॅक्टर रॅली काढायची आहे. ट्रॅक्टर शिस्तबंधपणे काढली जाईल. या रॅली रुग्णवाहिकाही असेल. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवरून ही रॅली काढण्यात येईल, असं शेतकरी नेते सतनाम सिंह पन्नु यांनी सांगितलं. दरम्यान, रॅलीसंदर्भात सकाळी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली. ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहमतीने ठरवण्यात आलेल्या मार्गाने रॅली काढण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या काही अटी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पोलिसांच्या परवानगीनंतर शेतकऱ्यांना रॅली काढता येणार असून, सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतरचं रॅलीच भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष दिल्ली पोलिसांच्या निर्णयाकडे लागलं आहे.