*सत्तेतील मराठा नेत्यांना गरीब मराठा समाजाबद्दल आस्था का नाही ?*

0
35

 

*सत्तेतील मराठा नेत्यांना गरीब मराठा समाजाबद्दल आस्था का नाही ?*

मराठा समाज म्हटले की आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, चेअरमन, बागायतदार, वतनदार, सत्ताधारी असे चित्र निर्माण झालेले आहे. हे चित्र पूर्णता सत्य नाही. मराठा समाजातील सुमारे तीन ते चार टक्के वर्ग हा सधन आणि सत्ताधीश आहे. याचा अर्थ संपूर्ण समाज सधन आणि सत्ताधीश आहे, असे होत नाही.सुमारे 95 टक्के मराठा समाज हा अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.

गरीब मराठा व सत्तेतील सधन मराठा अशी दरी कोकाटे निर्माण करतात, अशी टीकाही माझ्यावर तुम्ही करणार याची मला जाणीव आहे. परंतु, खरे सांगा! गरीब मराठ्यांनी या सत्तेतील सधन मराठ्यांचे आजवर किती केले, मान-सन्मान जपले; त्याबदल्यात त्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी कधी प्रयत्न केला का?. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळात किंवा संसदेत ना.वडेट्टीवार यांच्याप्रमाणे आग्रही भूमिका मांडणारा एक तरी मराठा नेता आहे का? त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापूर्वी वास्तव समजून घ्या.

मराठा समाजातील खूप मोठा समुदाय हा अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, माथाडी कामगार, झोपडपट्टीत राहणारा, हमाल, मजूर, ऊस तोड कामगार, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन आहे. तो अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांकडे जमीन आहे म्हणून तो श्रीमंत आहे, असा निकष लावणे चुकीचे आहे,कारण जमिनीची मशागत, पेरणी, खतं, बी-बियाणे, काढणी यासाठी खूप खर्च आणि कष्ट करावे लागते. पिकतं किती आणि उत्पन्न मिळतं किती हा प्रश्न आहे. शेतीमध्ये राब-राब राबून त्याच्या श्रमाचे मूल्य नाही. अपवाद वगळता अनेक साखर कारखाने काटा मारतात. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होते. *अनेक कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊसापासून नव्हे तर शेतकऱ्यांच्या रक्तापासून साखर तयार करतात.* असे खेदाने म्हणण्याची स्थिती आमच्यावर आणली आहे.

अनेक साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलतात. त्याची शेती तारण ठेवतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो का? नाही. तर गरीब शेतकऱ्यांच्या तारणावर फायदा साखर कारखानदारांना होतो. सामान्य शेतकऱ्यांनी गावोगावी फिरून शेअर्स गोळा केले.सामान्य शेतकऱ्यांच्या
शेअर्सवर उभ्या राहिलेल्या साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना अपवाद वगळता नफा मिळाला का?. नाही मिळाला.वर्षाकाठी निकृष्ट दर्जाचे एखादे साखरेचे ठिके मिळते.त्याचे सभासदाला पैसे मोजावे लागतात. गरीब मराठा हा सत्तेतील सधन मराठ्यांना काय साखरेचं नित्कृष्ट ठीके वाटले काय? नफा चेअरमननी पळविला.

शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या अनेक कारखान्यांचे अनेक मराठा नेत्यांनी खाजगी कारखाने केले.गरिबांचा सहकार गिळून टाकला.शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, केशवराव विचारे,विठ्ठलराव विखे पाटील,यशवंतभाऊ मोहिते,गोविंदबापू पाटील इत्यादी नेत्यांनी महाराष्ट्रात उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यावर सद्या नांगर फिरविण्याचे काम सुरू आहे.सहकारी साखर कारखाने मोडून आज एका/एका नेत्याकडे दहा-दहा खाजगी कारखाने झाले. सहकारी साखर कारखाने तोट्यात घालवून मातीमोल किंमतीत विकत घेण्याची वाईट पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे. हे कारखानदार अंबानी, अदानीचे गावठी अवतार आहेत. जे ऊस उत्पादक शेतकऱयांना प्रचंड छळतात.यांना गरीब मराठ्याबद्दल अजिबात आस्था नाही.आस्था असती तर भुजबळ, वडेट्टीवार यांच्याप्रमाणे संसद,विधिमंडळात त्यांनी गरीब मराठा समाजासाठी आवाज उठवला असता.

गरीब मराठयांकडे शिक्षणासाठी पैसा नाही. औषध उपचारासाठी पैसा नाही. अत्यंत गरिबी असल्यामुळे मराठा समाजाच्या मुलामुलींच्या लग्नाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.गरीब मराठा तरुणांची लग्न जमत नाहीत.शिक्षण घेऊन नोकरी नाही.मार्कस असून ऍडमिशन मिळत नाही, त्यामुळे गरीब मराठा समाजामध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. गरीब मराठा शेतकऱ्याचे जगण्याचे पर्याय कमी कमी होत चाललेत. मग, आत्महत्येशिवाय त्याच्यापुढे पर्याय उरत नाही. हे क्रूर राजकारण आहे, हे अनेक वर्षापासून मी सांगत आलेलॊ आहे.

कांही विचारवंत, विधिज्ञ मराठा समाजाला आरक्षण देणे कसे चूक आहे, हे सांगत असतात. त्यांना आम्हा गरीब मराठ्याची विनंती आहे. गावगाड्यात या गरीब मराठयांची अवस्था पाहा.सत्तेतील मराठा नेत्यांकडे पाहून मराठा समाजाबद्दल तुमचे मत तयार करू नका.आम्ही शिवरायांचे गरीब मावळे आहोत.तुकोबांचे कुणबी आहोत.आमचा मार्ग फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. किड्याबरोबर गहू रगडू नका,ही विनंती आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवून महाराष्ट्रात सामाजिक क्रांती होणार नाही.सामाजिक ऐक्यासाठी गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या परिघाबाहेर ठेवता येणार नाही,भविष्यात ते सर्वांसाठी घातक ठरेल.

शासन व्यवस्था आपल्या विरोधात आहे, उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर त्यासाठी भाग भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बँका कर्ज देत नाहीत. गावगाड्यातील माळी, धनगर, वंजारी, लेवा पाटील, कुंभार, लोहार, सुतार, आगरी यांची जी दुःखदायक अवस्था आहे तीच गावगाड्यातील गरीब मराठा समाजाची अवस्था आहे. पण त्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडणारे सत्तेतील मराठा नेते नाहीत. सत्तेतील बडे मराठा नेते हे सामान्य गरीब मराठा समाजाला गृहीत धरतात. त्यांना आरक्षण मिळावे ,त्यांची बाजू पोटतिडकीने मांडावी. असा स्ट्रॉंग मराठा नेता आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही दिसत नाही.

गरीब मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणातील आणि नोकरीतील आरक्षण मिळावे, ही माफक अपेक्षा गरीब मराठा समाजाची आहे. सामान्य गरीब मराठा समाजाला असे वाटते, की सत्तेतील मराठा आमदार,खासदार, मंत्री जणू आपले उद्घारकर्ते, पालनकर्ते आहेत. परंतु सत्तेतील मराठा नेते स्वतःचे कारखाने, सहकारी संस्था वाढविण्यात, वाचविण्यात मग्न आहेत. ते आपल्या पत्नीला, मुलीला, सुनांना,भाच्यांना मुलांना-नातवंडांना,पुतण्यांना,जावयांना,व्याह्यांना,मेव्हण्यांना राजकारणात सेटल करणे, हा त्यांचा अग्रक्रम आहे. आपल्या जवळच्या नात्यागोत्यातील लोकच सत्तेत राहिले पाहिजेत, यासाठी त्यांची धडपड आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील आदिलशाही सरदारांची टोळी झालेली आहे.

न्यायासाठी आवाजउठवणारा एखादा निर्भीड, प्रामाणिक मराठा तरुण सत्तेतील मराठा नेत्याला विरोधक वाटतो, शत्रू वाटतो. त्यांची अशा गरीब मराठ्यांची बाजू घेणाऱ्याला समजून घेण्याची अजिबात इच्छा नसते. तर आपल्या मुलांना, नातवंडांना आणि नातेवाईकांनाच राजकारणात सेटल करणे, हेच त्यांचे जीवन कार्य आहे. इतके संकुचित व स्वार्थी नेतृत्व पाहूनही गरीब मराठा त्यांच्या विरोधात भूमिका घेत नाही, हे तरी सधन मराठा नेतृत्वाने समजून घेतले पाहिजे.जोपर्यंत गरीब मराठा समाज सत्तेतील मराठा नेत्यांचा जयजयकार करतो,मतदान करतो तोपर्यंत तो त्यांचा खूप लाडका असतो,परंतु जेव्हा गरीब तरुण निवडणुकीत उभा राहून अन्यायाविरुद्ध न्यायाची भाषा बोलतो,तेंव्हा त्यांना लाडका गरीब तरुण दुष्मन वाटायला लागतो.

बिचारा गरीब मराठा समाज हा सत्तेतील मराठा नेत्यांकडे पाहून आपल्याला कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर जगत असतो. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, गोरगरिबांची मुले उभी राहावीत, त्यांना शिक्षण मिळावे,अपवाद वगळता एखादा शिक्षण सम्राट गरीब विद्यार्थ्यांना डोनेशन न घेता शिक्षण देतो का? त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी त्यांची धडपड नाही.

सत्तेतील मराठा नेते ही संसदीय लोकशाहीतून आलेल्या नवसरंजामदारांची टोळी आहे.कोणाचे जरी सरकार आले तरी ते सत्तेत असतात.ज्याप्रमाणे मध्ययुगीन काळात केंद्रीय सत्ता जरी आदिलशाह,निजामशाह, मोगलशाह यांची असली तरी सरंजामदार सत्तेत असायचे.त्याप्रमाणे आजचे नवसरंजामदार आहेत.सामान्य मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली.सर्वसामान्यांच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले.

आजही शिवरायांची बदनामी झाली, तेंव्हा सामान्य कुटुंबातील मावळे धावून आले. जेम्स लेन प्रकरणी गरीब कुटुंबातील 72 तरुण मावळ्यांनी बदनामी कटातील भांडारकर संस्थेवर कारवाई केली. संभाजीराजांच्या बदनामीस कारणीभूत असणारा गडकरीचा पुतळा सामान्य कुटुंबातील तरुणांनी हटविला.याचा फायदा सत्तेतील नवसरंजामदारांना झाला,पण सत्तेतील मराठा नेत्यांची मुले रस्त्यावर उतरलेली नाहीत.सनातन्यांनी नवसरंजामदारांच्या मदतीने बसवलेला दादोजी कोंडदेवचा पुतळा हटविण्यासाठी संभाजी ब्रिगेड, बामसेफ आणि लोकशासन आंदोलन या संघटनांना आंदोलन करावे लागले,तेंव्हा तो अनैतिहासिक पुतळा हटला.जिजाऊ माँसाहेब, शिवाजीराजे, संभाजीराजे यांच्या सन्मानासाठी पुरंदेरेच्या विरुद्ध सत्तेतील मराठा आमदार-खासदारांची मुलं कधी रस्त्यावर आली का ? फायदा मात्र यांच्या बापजाद्यांना होतो.संसदीय लोकशाहीतुन निर्माण झालेले नवसरंजामदार महाराष्ट्रावर आलटून- पालटून राज्य करत आहेत.

बहुतांश सत्तेतील मराठा नेत्यांची आणि सनातन्यांची युती आहे.याचा फटका सामान्य गरीब तरुणांना बसतो.ज्या भिडेनी महाराष्ट्रात दंगली घडविल्या, त्या दंगलखोर भिडेला सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बडा नेता सोबत घेऊन बसतो.ज्या तोगडियाने गुजरातमध्ये हिंदु- मुस्लीम दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्या तोगडियाला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता त्याची फार्महाऊसावर पाद्यपूजा करून त्याला भोजन घालतो. दंगलखोर एकबोटेंला कोणी अभय देऊन पुरोगाम्यांच्या विरुद्ध सोडले ?

एकबोटे,भिडे-तोगडियामुळे अनेक गरीब तरुणांचे जीवन उध्वस्थ झाले आहे. अशा दंगळखोरांना तसेच जिजाऊमाता,शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या पुरंदरे-कुबेरांसारख्या विकृतांना पोसण्याचे काम जसे भाजप-सेनेतील नेत्यांनी केलेले आहे, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठा नेत्यांनी देखील केलेले आहे. ज्यावेळेस फडणवीसांनी हुकूमशाही पद्धतीने विकृत पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्याविरुद्ध सर्वसामान्य जनता लढत होती.त्यावेळेस अपवाद वगळता महत्त्वाचे मराठा नेते फडणवीसांचे पाय चाटून पुरंदरेंचे कौतुक करत होते.योग्यवेळी पुराव्यांसह त्यांची नावे जाहीर करू.सारांश सरंजामदार-सनातन्यांच्या युतीत सामान्य गरीब तरुण भरडला जात आहे. त्यांना धार्मिक दंगलीत अडकवून त्यांच्या शिक्षण, रोजगार, पाणी, रस्ते, आरोग्य, नोकरी, आरक्षण, सामाजिक, आर्थिक प्रश्न यावर चर्चा होऊ द्यायची नाही.

गरीब मराठा समाजासाठी निर्भिडपणे, प्रामाणिकपणे झगडणारा एकही गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ,विजय वडेट्टीवार यांच्यासारखा प्रामाणिक, हिंमतवान नेता सत्तेतील मराठा समाजात नाही. असा नेता मराठा समाजात का तयार झाला नाही? त्याचे कारण मराठा नेते सामान्य, गरीब, उपेक्षित, वंचित मराठा समाजाला गृहीत धरतात. आपण कसे जरी वागलो तरी विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मराठा समाज आपल्यालाच मतदान करणार, ही त्यांना शंभर टक्के खात्री असते. जोपर्यंत सामान्य गरीब मराठा समाज या निर्दयी सत्ताधीश मराठ्यांच्या जोखडातून बाहेर पडत नाही व त्यांना धडा शिकवत नाही. तोपर्यंत सामान्य गरीब मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.सर्वच समाजातील गरिबांनी एकत्र येऊन या नवसरंजामदारांविरुद्ध लोकशाही मार्गाने लढले पाहिजे. आयोग आले,न्यायालयीन लढा झाला,परंतु आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. पिढ्यान पिढ्या सामान्य गरीब मराठ्यांच्या जीवावर सत्तेत बसलेल्या मराठा नेत्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवल्याशिवाय गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.

सत्तेतील मराठा नेते दबक्या आवाजात म्हणतात की “मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्ता जाईल”, असा संकुचित विचार ही नेत्यांची मनोविकृती आहे.असा जर मराठा नेतृत्वाचा सुविचार असेल तर, सत्ता गेलेलीच बरी कारण ती गरीब मराठा समाजाच्या फायद्याची नसेल तर असून काय उपयोगाची आहे?. ती काय फक्त तुमच्या पुढील शंभर पिढयांची व्यवस्था लावण्यासाठी पाहिजे काय?. गरीब मराठयांचे कष्ट काय सत्तेतील सधन मराठा नेत्यांच्या पुढील शंभर पिढयांची व्यवस्था लावण्यासाठी आहे काय ?. यापुढे गरीब मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्याच्या पाठिशीच मराठा समाजाने राहिले पाहिजे. जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात, ते जेवढे दोषी आहेत,त्यापेक्षा जे मराठे सत्तेत असूनही मराठा आरक्षणाबाबत अवाक्षर बोलत नाहीत, ते जास्त दोषी आहेत,असे जे तरुण इतिहास व मराठा प्रश्नांचे अभ्यासक अमरजित पाटील म्हणतात, त्यात तथ्य आहे.

गरीब मराठ्यांनी सत्तेतील नवसरंजामदार मराठयांच्या जोखडातून सुटका करुन घेतली तरच त्यांना भवितव्य आहे, जगण्याची नवी आशा आहे. तरच त्यांना त्यांचे नवीन नेतृत्व निर्माण करता येईल, नवीन व्यवस्था बनवता येईल. आपल्या
अनेक पिढ्या बरबाद झाल्या,आता इथून पुढच्या पिढ्या बरबाद होऊ दयायच्या नाहीत.श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत चालले आहेत,यावर चिंतन करून लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारण्याची वेळ आलेली आहे.

*- डॉ.श्रीमंत कोकाटे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here