निरोगी मनासाठी आहार कसा असला पाहिजे ? आयुर्वेदात आहार आणि मन यांचं नातं काय ? अन्न, हॉर्मोन्स आणि मानसिक आरोग्याचं नातं? मानसिक आजार हा फक्त भावनांचा किंवा विचारांचा आजार आहे. मग, याचा आहाराशी काय संबंध? खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

0
138

तुम्ही काय खाता यावर तुमचं मानसिक आरोग्य कसं असेल हे अवलंबून आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोकांना हे पटणार नाही किंवा मान्य होणार नाही.

तुम्ही म्हणाल, मानसिक आजार हा फक्त भावनांचा किंवा विचारांचा आजार आहे. मग, याचा आहाराशी काय संबंध? खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते, आहार आणि मानसिक आरोग्य याचं जवळचं नातं आहे. मेंदू दिवसरात्र शरीराच्या विविध क्रिया नियंत्रित करत असतो. यासाठी लागतं ते इंधन म्हणजे अन्न. त्यामुळे तुम्ही काय खाता, हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

फोर्टिस रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. केदार तिळवे सांगतात, “तुम्ही जे अन्न खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या मूडवर होतो.”

मग, आहार आणि मानसिक आरोग्याचं नातं काय? आहारामुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मानसिक आरोग्याच्या आहाराशी संबंध काय?

आहाराचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो. हे समजावून घेण्याआधी मानसिक आरोग्य म्हणजे काय? याची माहिती घेणं गरजेचं आहे.

मानसिक आरोग्याचे भावनिक, मानसशास्त्रीय (psychological) आणि सामाजिक आरोग्य असे तीन भाग आहेत.

नानावटी रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी खुल्लाली सांगतात, “आहार आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत. शरीराला योग्य प्रमाणात लागणारा पौष्टीक आहार आणि मानसिक आजाराशी यांचा एकमेकांशी संबंध आहे.”

मेंदूला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. ही उर्जा अन्नातून मिळते. समतोल आहारामुळे मेंदूला पॉझिटिव्ह रहाण्यासाठी गरजेचे पौष्टीक अन्नपदार्थ मिळतात. ज्यामुळे मेंदूची कार्यपद्धती सुधारते.

आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल म्हणतात, “मानसिक आरोग्याचा संबंध मेंदू, पोट आणि आपली आहारपद्धत म्हणजे आपण काय खातो याच्याशी असतो.”

अनेकांना खूप गोड खाण्याची सवय असते. तर, काहींना जंकफूड किंवा फास्टफूड खूप आवडतं. तज्ज्ञ सांगतात, या अन्नपदार्थांचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. कारण, गोड पदार्थांचं रुपांतर फॅटमध्ये होतं. त्यामुळे, मेंदूतून काही हॉर्मोन्स बाहेर पडण्यास सुरूवात होते.

डॉ. पटेल पुढे सांगतात, “जास्त फॅटी डाएटमुळे, शरीरातून कॉर्टिस्टेरॉन हॉर्मोन स्रवतं. हे हॉर्मोन स्ट्रेस, चिंता याच्याशी संबंधित आहे.” या हार्मोनमुळे फॅटी किंवा जंकफूड खाल्ल्यावर मेंदूवर परिणाम होतो.

खूप जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे मेंदूत एक रासायनिक बदल होतो. याला न्यूरोकेमिस्ट्री म्हणतात.

“हे हॉर्मोन पहिल्यापासूनच स्रवण्यास सुरूवात होत नाही. अतिजास्त प्रमाणात फॅटी खाल्याने हे हॉर्मोन स्रवण्यास सुरूवात होते,” डॉ. जिनल सांगतात.

खाण्या-पिण्याच्या सवयी आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम यांच्यासाठी डॉ. तिळवे उदाहरण देतात.

ते म्हणतात, “जेवल्यानंतर मद्यप्राशन किंवा तंबाखूसेवन यामुळे चिंता अधिक वाढते.” तर, जास्त गोड पदार्थ सेवन करणाऱ्यांना अटेंन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (ADHD) आणि जीवनशैलीशी निगडीत आजार होतात.

निरोगी मनासाठी आहार कसा असला पाहिजे?

मन निरोगी ठेवण्यासाठी आहार कसा असला पाहिजे. रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.

मनावर येणारं दडपण, ताण कमी करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असावेत. याबाबत आम्ही आहारतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील व्होकार्ट रुग्णालयातील आहारतज्ज्ञ (न्यूट्रीशनिस्ट) डॉ. अमरीन शेख म्हणतात, “योग्य अन्न खाल्याने तुमचं मन शांत रहाण्यास मदत होते. मनावर येणारा स्ट्रेस किंवा तणाव कमी होतो.”

स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि स्ट्रेस हॉर्मोन्स नियंत्रित करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत डॉ. अमरीन माहिती देतात.

  • बेरी किंवा ‘क’ जीवनसत्व असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे (लिंबू, पेरू, आवळा, संत्र, कॅप्सिकम) रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसोल कमी होण्यास मदत होते
  • बेरी, स्ट्रेस किंवा तणावाचा सामना करण्यासाठी शरीराला मदत करतात
  • दूधातील प्रथिनं रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि स्ट्रेस हॉर्मोन कमी करतात
  • पूर्णधान्ये- चांगल्या पिष्ठमयपदार्थांमुळे मेंदूतून ‘सेरोटोनिन’ नावाचं केमिकल निघण्यास मदत होते. यामुळे मूड सुधारतो.
  • व्हिटॅमिन ‘बी’ असलेले पदार्थ खाल्यामुळे चिंता कमी होते

डॉ. तिळवे म्हणतात, थोडं डार्क चॉकलेट खाल्याने मूड छान होतो.

तज्ज्ञ म्हणतात, शरीरात व्हिटॅमिन डी कमी असेल तर डिप्रेशनसारखे आजार होतात. पण, व्हिटॅमिनचं सेवन सुरू केल्यानंतर आजार बरा होतो.

वजन कमी करण्यासाठीच्या डाएटचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो?

वजन कमी करण्यासाठी हल्ली अनेक लोक डाएटचा मार्ग स्विकारतात. डाएटमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. पण,मानसिक आरोग्यावर परिणाम होतो डॉ. जिनल म्हणतात.

त्या सांगतात, “काही लोक वजन कमी करण्यासाठी खूप डाएट करतात. वजन कमी झालं नाही तर, स्वत:ला दोष देतात. सारखे दडपणाखाली असतात. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.

तज्ज्ञ म्हणतात, वजन कमी करण्याचं आणि ‘बॉडी शेप’मध्ये असली पाहिजे या वेडापायी लोकांचं मानसिक स्वास्थ बिघडतं. काही लोकांना ‘अॅनोरेक्सिया’ सारखा आजार होतो. यावर उपचार करावे लागतात.

यासाठी तज्ज्ञ फॅट सेल्सपासून निघणाऱ्या लेप्टीन हॉर्मोनबद्दल सांगतात. हे हॉर्मोन वजन आणि फॅटवर नियंत्रण ठेवते. लेप्टीन रिलीज होताना मेंदूला सिग्नल देतो. यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल होतो.

डॉ. पटेल म्हणाल्या, लठ्ठ व्यक्तींच्या शरीरात लेप्टीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे, मेंदू प्रतिक्रिया देत नाही. मग, शरीरात फॅट असूनही लठ्ठ लोक जास्त चरबीयुक्त खातात.

आयुर्वेदात आहार आणि मन यांचं नातं काय?

आयुर्वेदात सांगण्यात आलंय, की “मन आहारमय आहे.”

मुंबईतील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटील म्हणाले, “तुम्ही कुठलं अन्न खाता, त्यानुसार तुमचं मन तयार होतं.”

आपण सहजतेने म्हणतो ताप आलाय. पण, आयुर्वेदाच्या व्याख्येनुसार “तापामध्ये शरीर आणि मनाचा संताप होतो.”

ते पुढे सांगतात, “शरीरातील अन्न न पचल्याने आम तयार होतो. यामुळे तापाची निर्मिती होते. त्यामुळे लंघन ही पहिली उपचारपद्धत सांगण्यात आलीये.”

लंघन केल्याने अन्नाचं पचन होईल. मग प्रश्न पडतो की मनाचं काय? ते म्हणतात, “मन आहारमय आहे. लंघन केल्याने मन चांगलं रहातं. त्यामुळे चांगला आहार केल्यास मनात चांगले विचार निर्माण होतात. त्यामुळे आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.”

लहान मुलांचा फास्टफूड खाण्याकडे जास्त कल दिसून येतो. याचा मनावर परिणाम होतो का? डॉ. पाटील सांगतात, “फास्टफूडमधील काही घटक शरीरासाठी हानिकारक आहेत. हे पदार्थ मनामध्ये आळस निर्माण करणारे आहेत. अशा पद्धतीने आपण आहार आणि मन यांच्या नात्याकडे बघायलं हवं.”

योगमध्ये आहार आणि विचारांचा काय संबंध सांगितलाय?

आपण बऱ्याचदा म्हणतो, “जसं अन्न तसं मन.”

आहार, विहार, आचार आणि विचार यांना ‘योग’ शास्त्राच्या चतुसुत्री किंवा चार प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.

योग शास्त्रानुसार आहार आणि विचार यांचा थेट संबंध आहे.

तैत्तिरिय उपनिषदात अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांची माहिती देण्यात आली आहे.

योग प्रशिक्षक दिलीप दवे म्हणतात, “आपण जे अन्न खातो. याचा शरीरावर काय परिणाम होतो. हे अन्नमय कोषातून कळतं. तर, शरीरात उद्भवणाऱ्या बहुतांश व्याधींचं कारण, प्रामुख्याने मानसिक स्तरावर असतं.”

योग शास्त्रानुसार, मानसिक दडपण आलं की त्याचा प्रभाव शरीरातील ‘प्राण’ ज्याला आपण ऊर्जा (एनर्जी) म्हणून ओळखतो त्यावर होतो.

ते पुढे सांगतात, “मानसिक दडपणामुळे, श्वासोच्छवास किंवा ब्रिदिंगवर परिणाम होतो. आणि याचा थेट संबंध अन्नमयकोषासोबत किंवा आहारासोबत आहे.”

जसा, विचारांचा आहारावर परिणाम होतो. तसाच, आहाराचा परिणामही मनावर होतो.

दिलीप दवे सांगतात, यासाठी योग तत्वज्ञानात तीन प्रकारच्या आहारांबाबत सांगण्यात आलंय. सात्विक, तामसिक आणि राजसिक.

  • तामसी म्हणजे अर्धवट शिजवलेलं अन्न किंवा शिळं अन्न. ज्यामुळे एनर्जी (प्राण) लेव्हल कमी होते आणि आळसपणा येण्याची शक्यता असते
  • राजसी म्हणजे- तिखट किंवा स्पायसी अन्न खाल्याने एनर्जी (प्राण) ओव्हर अॅक्टिव्हेट होते. यामुळे मेंटल टर्ब्यूलन्स वाढतो, श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यासारखं होतं
  • सात्विक म्हणजे फळं, भाज्या खाल्याने शरीरातील एनर्जीचा (प्राण) समतोल राखला जातो. ज्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळत रहाते. त्यामुळे तुमचं मन सकारात्मक रहातं

अन्न, हॉर्मोन्स आणि मानसिक आरोग्याचं नातं?

पोटात असलेल्या बॅक्टेरियामुळे ताण वाढतो. यावर दही खाणं एक उत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

दही मेंदूतील भावनांच्या भागावर परिणाम करतं. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

डोपामाईन, सेरोटोनिन आणि एन्डोर्फिन्स यांना हॅपी हॉर्मोन्स म्हटलं जातं. डोपामाईन हॉर्मोन मेंदूत तयार केलं जातं.

डॉ. अमरीन शेख पुढे म्हणतात, “शरीरातून निघणारे 90 टक्के हॉर्मोन्स ‘गट’ म्हणजे आतड्यात तयार होतात.

त्यामुळे, आतड्यांचं आरोग्य किंवा आतडी निरोगी असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.”

फास्टफूड किंवा जंकफूडमुळे अॅसिडीटी तयार होते. पोटातील बॅक्टेरियांवर परिणाम होऊन मूड स्विंग होतात.

त्यामुळे, आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात हाय फायबर आणि प्रो-बायोटिक्सचा समावेश करण्यात आला पाहिजे.

अति-चिंता किंवा ताण यामुळे कधी जास्त खाणं किंवा काहीतरी खावं असं तुम्हाला वाटलंय? असं बऱ्याचवेळा होतं की, ताणामुळे आपण जास्त खातो.

“ताणामुळे आपण जास्त खातो. काही लोक ताण कमी करण्यासाठी गोड पदार्थ किंवा फास्टफूडची मदत घेतात. यामुळे तात्पुरतं बरं वाटतं. पण, हे चुकीचे पर्याय आहेत,” डॉ. शेख सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here