कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या, आजपासून भाजपचे राज्यभर बँकांसमोर आंदोलन : चंद्रकांत पाटील

0
333

राज्य सरकारच्या ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.                                                                                                                                जळगाव : पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे. तसेच, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष सोमवार (ता.22) राज्यात ठिकठिकाणी बँकासमोर ‘कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या’ आंदोलन करणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण, शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी आमची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच, शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल.

राज्यात लाखाच्यावर शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. चणा खराब होण्याची वेळ आली तरी तरी खरेदी होत नाही. खरीप पिककर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, चण्याचे पैसे आलेले नाही. बियाणे, खत, मजुरी भागवायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. दागिने गहाण ठेवून शेतकरी सावकाराकडे विनवणी करतो आहे. भाजपने फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन केले होते व त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती, असे पाटील यांनी सांगितले.

सद्य:स्थितीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची एवढी दयनीय अवस्था आजपर्यंत कधीही झालेली नव्हती. तूर, चना, कापूस पडून आहे, कर्जमाफी कागदावरच आहे आणि पिककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दोन लाखाच्या वरच्या कर्जासाठी ‘ओटीएस’ लागू करु आणि नियमित कर्ज भरणाऱ्याना , पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ, असे अर्थसंकल्पात जाहीर केले. प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही.

दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही. जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून कर्जमाफीपासून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने 22 मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘शासनाच्या नावे कर्ज मांडावे’ असे बॅंकांना सांगितले. बॅंकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. दोन लाखांच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ‘ओटीएस’चा आणि नियमित कर्ज भरणाऱ्याच्या प्रोत्साहन अनुदानाचा आदेश निघाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या “कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशाऱ्याला बॅंका जुमानत नाहीत, असे पाटील यांनी नमूद केले.

दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करत नाहीत, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी कोरडवाहूला पंचवीस हजार रुपये, फळबागांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, या घोषणा सरकार विसरले. कोकणामध्ये आपद्ग्रस्तांची तातडीची मदत पोहोचलीच नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलच घेतली नाही.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here