जळगाव जिल्ह्यात दररोज हजार कोरोना चाचण्यां करण्याची यंत्रणा उभारणार ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत

0
366

जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी “ट्रेसिंग’ वाढविणे आवश्‍यक आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतल्यास त्याचे निदान होईल. सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत संशयित रुग्ण तपासणी मोहीम हाती घ्यावयाची आहे.                                            जळगाव : “कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात बुधवारपासून (ता.24) 8 जुलैपर्यंत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. तसेच दररोज हजार चाचण्या होतील, अशी व्यवस्थाही आठवडाभरात करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.  कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी “गुगल मीट’द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले व अन्य अधिकारी सहभागी झाले होते. तर प्रत्यक्ष बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडट गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

रुग्णांचे “ट्रेसिंग’ वाढविण्यावर भर
जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी “ट्रेसिंग’ वाढविणे आवश्‍यक आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतल्यास त्याचे निदान होईल. सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत संशयित रुग्ण तपासणी मोहीम हाती घ्यावयाची आहे. या कालावधीत बाधित रुग्णाच्या संपर्काबरोबरच 50 वर्षावरील रुग्णांची तपासणी करावयाची आहे. नागरिकांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तींची स्वतंत्र नोंद ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

दररोज हजार चाचण्या करणार
संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणी तातडीने होणे आवश्‍यक आहे. याकरिता पुढील आठवड्यापर्यंत स्थानिक लॅबची क्षमता वाढविण्यात येणार आहे. शिवाय खासगी लॅबच्या माध्यमातूनही स्वॅब तपासणी वाढविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी स्थानिक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्राची अचूक आखणी
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील “हाय रिस्क’ व “लो रिस्क’ची माहिती घेऊन त्यांचा शोध घ्यावा. यासाठी केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शिवाय प्रतिबंधित क्षेत्राची अचूक आखणी करावी. “हाय रिस्क’मधील व लक्षणे आढळून येणारे कोणीही संशयित होम क्वारंटाइन राहणार नाही. संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना चहा, नाश्‍ता, जेवण वेळेवर मिळेल, याची सर्व संबंधितांनी काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.

गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई
अत्यावश्‍यक सेवेतील कोणीही डॉक्‍टर, अधिकारी, आरोग्य कर्मचारी गैरहजर राहणार नाही. साथरोग नियत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. गर्दी टाळण्यासाठी परवानगीशिवाय कुठलेही कार्यक्रम होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी, मास्क न वापरणाऱ्यांवर दंड करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here